हडपसर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने शनिवारी (ता. २०) पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यंदाचे आठवे वर्ष आहे.
स्पर्धेचे प्रमुख पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, महिलाध्यक्षा ज्योती लडकत, दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, माजी सभापती अविनाश गोफणे, जिल्हा बँकेचे संचालक रणजित तावरे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, गटशिक्षणाधिकारी संपत गावडे, शाम भोसले, डॉ. योगेश पवार, धनवान वदक, महेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत या स्पर्धेच्या नियोजनाची सोमवारी (ता. १५) बैठक झाली. मुख्य राष्ट्रीय स्पर्धा हडपसर ग्लायडिंग सेंटर ते बारामती विद्यानगरी चौक अशी होणार असून एमटीबी खुली सायकल स्पर्धा तसेच राज्य शासन कर्मचाऱ्यांसाठीही सासवड ते बारामती अशी ८५ किलोमीटरची स्पर्धा होईल.
महिलांसाठी माळेगाव ते बारामती अशी १५ किलोमीटरची स्पर्धा होणार आहे. शनिवारीच दुपारी बारामतीतील गदिमा सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. राष्ट्रीय सायकल स्पर्धेत कोरप्पा कुक्कडी, श्रीनिवास राजपूत, संतोष पुजारी, गौतम बेलेरी, यालाहुरेश गड्डी, मल्लेश बॅजर, कृष्णा बंगी, महेंद्र व्ही. आर, दिपिका फडतरे, ज्योती राठोड, सुमा बगळी, सावित्री रुगी, यांच्यासह अनेक नामवंत सायकलपटू सहभागी होणार असल्याचे संदीप कदम यांनी सांगितले. कर्नाटक, आंध्र, सेनादल, चंडीगड, दक्षिण मध्य रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे, वायुदल, तमिळनाडू, बिहार, गुजराथ, मध्यप्रदेश, रेल्वे, राजस्थान तसेच दिल्लीचे सायकलपटू सहभागी होतील. दरम्यान, महाराष्ट्र सायकल असोसिएशन स्पर्धेच्या समन्वयाची जबाबदारी सार्थक मालुसरे व संजय दराडे यांच्यावर दिली आहे.