पुणे – अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्यावी आणि एमएसआयडीसीकडे वर्ग करण्यात आलेले पुणे शिरुर व तळेगाव चाकण शिक्रापूर या एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान आज खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित राष्ट्रीय महामार्गांच्या कामासंदर्भात केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेऊन निविदा प्रक्रिया झालेल्या नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी केली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे (MSIDC) वर्ग केलेले पुणे शिरुर व तळेगाव चाकण शिक्रापूर हे एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणीही डॉ. कोल्हे यांनी केली. यावेळी केंद्रीयमंत्री गडकरी यांनी नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या तीनही राष्ट्रीय महामार्गांच्या कामांबाबत डॉ. कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरूर या तीन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदा प्रक्रिया सुरू झाल्या होत्या. परंतु लोकसभा निवडणूक संपल्यानंतर या तीन एलिव्हेटेड कॉरिडॉरपैकी तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरूर हे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे (MSIDC) वर्ग करण्यात आले. नाशिक फाटा ते चांडोली हा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याने हा प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातूनच होणार आहे. परंतु सध्याची चाकण व परिसरातील वाहतूक कोंडी गंभीर झाली असल्याने अधिक विलंब न करता या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी द्यावी, असा आग्रह खासदार डॉ. कोल्हे यांनी धरला.
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे (MSIDC) हस्तांतरीत करण्यात आलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरूर हे दोन्ही प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली. या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी तीनही प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.