पुणे

मुसळधार पावसाने हडपसर मधील जनजीवन विस्कळीत – लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष, पावसाळी कामे मार्गी लावा अन्यथा आंदोलन प्रशांत जगताप यांचा इशारा…

पुणे (प्रतिनिधी)
48 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हडपसर व परिसरातील वाड्यावस्त्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले असताना लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन फिरकले नाही, प्रचंड यातना नागरिकांना सोसाव्या लागत असताना जनतेला वारेवर सोडून दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे, लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून समस्या सोडवल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

48 तास मुसळधार पाऊस झाला मुंढवा, केशवनगर, हडपसर, 15 नंबर, लक्ष्मी कॉलनी, रामटेकडी, एनआयबीएम, कोंढवा ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली व घराघरात पाणी शिरले, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले, आमदार व पालिका प्रशासनाने जनतेला वाऱ्यावर सोडले असताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पाहणी करून प्रशासनाला तातडीने सूचना देऊन नागरिकांना अडचणीतून मुक्त करण्याचे आवाहन केले. गुडघाभर पाण्यात जाऊन जगताप यांनी नागरिकांच्या समस्या समजावून घेतल्या.
मांजरी नदीवर नव्याने उड्डाणपूल बांधण्यात आला असून त्याचे उद्घाटनही झाले नसताना पाणी पुलालगत वाहत असल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे येथील वाहतूक बंद करण्यात आली असून शासनाचा कोट्यावधी निधी उदासीन लोकप्रतिनिधीमुळे पाण्यात गेल्याची टीका प्रशांत जगताप यांनी यावेळी केली.

हडपसर विधानसभा मतदारसंघात पावसाळी पूर्व कामे झाली नाहीत, महानगरपालिकेत नगरसेवक नसल्याने जनतेला वाली नाही, आमदारांना जनतेच्या समस्या सोडविण्यात रस नाही, प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांची कामे केली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रशांत जगताप यांनी दिला.