पुणेमहाराष्ट्र

पूर्व हवेलीत अवैध गौण खनिज जोमात; तलाठी आणि मंडळ अधिकारी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून कोमात…?

पुणे : प्रतिनिधी 

पुणे : हवेली तालुक्यात सध्या गौणखनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पूर्व हवेलीत अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणार्‍यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पावसाळा असल्यामुळे मुरुमाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडवून अवैधरित्या उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे. त्यामुळे उत्खनन व वाहतुकीला कोणाचा आशीर्वाद आहे?, असा सावाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

यासंदर्भात तिन दिवसांपूर्वी तक्रार करूनही तलाठी यांच्याकडून कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. यासंदर्भात विचारले असता तलाठी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सध्या मुरुमाला सोन्याचा भाव मिळत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अवैध रित्या मुरूम गौणखनिज उत्खनन जागोजागी होताना दिसत आहे. मात्र तलाठी, मंडळ अधिकारी कारवाई करत नाहीत त्यामुळे संशय निर्माण होत आहे.

अप्पर तहसीलदार कार्यालय हवेली यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मधील कवडीपाठ गुजरवस्ती या ठिकाणी गट न १०५० मध्ये अवैध गौणखनिज उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी अप्पर तहसीलदार व प्रांत हवेली यांनी करावी अशी मागणी होत आहे. तसेच सदरील ठिकाणी असणारे जेसीबी आणि ट्रॅक्टर यांची जप्ती करावी. तसेच कारवाईस जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांची कायदेशीर चौकशी करून दोषी आढळणार्‍यांवर निलंबणाची कारवाई करावी अशी मागणी कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

तलाठी यांना कारवाईसाठी स्थानिक नागरिकांनी संपर्क केला असता वारंवार उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याने स्थानिक तलाठी यांचे अनधिकृत गौणखनिज धारकांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा सध्या पूर्व हवेलीत मोठया प्रमाणात सुरु आहे. या प्रकरणात हवेलीचे अप्पर तहसीलदार काय भूमिका घेतात तसेच स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.