हडपसर / पुणे (अनिल मोरे )
पुण्याच्या पूर्व भागातील हडपसर विधानसभा मतदारसंघ भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मतदारसंघ असल्याने महाविकास आघाडी व महायुतीमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी साठी कोण बाजी मारणार यावरील पुढचे गणित अवलंबून असून उमेदवारीत पत्ता कट झालेल्या नेत्यांची भूमिका पुढील आमदारांसाठी महत्त्वाची असणार आहे.
हडपसर म्हणजे भविष्यातील स्वतंत्र महापालिका असून येथे वर्चस्व ठेवण्यासाठी विधानसभा मतदारसंघ ताब्यात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, राजकीय साठमारी व पक्ष फुटा फुटी मध्ये दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप याबरोबरच तिसरी आघाडी आणि मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आमदारांचे भवितव्य ठरविणारी असेल,
महायुती मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटातून विद्यमान आमदार चेतन तुपे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे प्रमुख दावेदार आहेत त्यातच भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्याने भाजपने हडपसर मतदार संघाचा दावा सोडल्याची चिन्हे आहेत, महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक योगेश ससाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महादेव बाबर तर काँग्रेस कडून माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान उमेदवार असल्याने या मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाचाच उमेदवार फायनल होणार असल्याची चर्चा आहे, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढविण्यास तयार आहेत, बाळासाहेब शिवरकर सुद्धा काँग्रेस व शरद पवार यांच्या पक्षातून इच्छुक आहेत, नुकत्याच हडपसर येथील काँग्रेसच्या एका कार्यालयात शरद पवारांची उपस्थिती होती तेव्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हा मतदार संघ काँग्रेसला सोडावा अशी आग्रही भूमिका घेतली तेव्हा माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी हडपसर मधून तरुण उमेदवार देणार असल्याचे सांगून प्रशांत जगताप यांची दावेदारी पक्की केली.
निवडणुकीत बंडखोरीची लागण होण्याची दाट शक्यता….
हडपसर विधानसभा मतदारसंघातून तुल्यबळ उमेदवार उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने माहिती व महाविकास आघाडीत उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे, महाविकास आघाडीतून जास्त स्पर्धक असल्याने बंडखोरीची लागण होण्याची शक्यता आहे, त्यातच माजी आमदार महादेव बाबर यांनी निवडणूक लढविणारच असा चंग बांधल्याने उमेदवारी कापल्यास ते बंडखोरी करण्याची जास्त शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील शिलेदार प्रमोद नाना भानगिरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत.
विद्यमान आमदारांच्या कामाबाबत मतदारसंघात नाराजी…
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेलेले विद्यमान आमदार चेतन तुपे यांना पाच वर्षाच्या कार्यकाळात सत्ता असूनही भरिव निधी आणता आला नाही, त्यातच लोकसभेला महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील पराभूत झाले, डॉ.अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाले, त्यामुळे महाविकास आघाडीच्या आशा उंचावल्या आहेत, भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचे काम करणार का? ज्यामुळे महायुतीच्या उमेदवारास फटका बसू शकतो.
भाजप व विद्यमान आमदारांची भूमिका महत्त्वाची…
नुकत्याच विधान परिषदेवर निवडून गेलेले भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी हडपसर मतदार संघात चांगली बांधणी केली आहे, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जात असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पुनर्वसन केले, आगामी विधानसभा निवडणुकीत टिळेकर यांची भूमिका महत्त्वाची असून पुढील आमदार ठरवितांना त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची मने जुळणार का? यावर पुढील राजकारण अवलंबून असणार आहेत.