पुणे ः येरवड्यातील ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदिरामधील दानपेटी फोडणाऱ्या टोळीला येरवड्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राजन पटेल, अक्षय शाहू, अथर्व वाटकर आणि अमित शेरीया (सर्व रा. नागपूर शहर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपीकडून एक लाख पाच हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली टीव्हीएस ज्युपिटर मोटरसायकल जप्त केली.
येरवडा पोलिसांनी २००हून अधिक सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला. त्यातील संशयित आरोपी पुणे स्टेशनवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली, त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने स्वरूप राजेश चोपडे (सध्या रा. मांजरी बु।।, ता. हवेली, मूळ गाव नागपूर) असे नाव सांगून गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील आरोपी अथर्व वाटकर याला नागपूर येथून ९ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. दोन आरोपीकडून गुन्ह्यातील चोरलेली रक्कम एक लाख ५ हजार आणि मोटारसायकल ४० हजार रुपये असा एकूण एक लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर येरवडा आणि चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) छगन कापसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, प्रवीण खाटमोडे, अनिल शिंदे, सूरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, विशाल निलख यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.