पुणे

इंद्रियाच्या भोग विलासात रममाण होणाऱ्यांकडून परस्त्रीची अवहेलना!

बदलापूर येथील शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार, कोलकाता येथील रुग्णालयातील डॉक्टरवरील बलात्कार, कोल्हापूर येथील मुलीवर अत्याचार करुन खून, दौंड तालुक्यातील मळद येथे शिक्षकाकडून मुलींचं लैंगिक शोषण, अमळनेर येथे अल्पवयीन मूकबधिर मुलीवर अत्याचार, नेरूळच्या करावे गावातील तरुणीवर लैंगिक अत्याचार या सर्व बातम्या वाचून मन सुन्न होते. एवढे व्यभिचारी आपण का झालो आहोत ? असा प्रश्न पडतो.

खरं तर भारतीय संस्कृतीत कन्येला, स्त्रियांना सर्व श्रेष्ठ मानून सर्वोच्च स्थान दिले आहे. आपल्या संत महंतांनी देखील स्त्रियांचा आदर करायला सांगितले आहे.

पूर्वपरंपरागत इतिहाससुद्धा आपणास ‘स्त्री’बद्दल आदराची भावना जपण्यास सांगतो. परंतु सध्या मात्र स्त्रियांबाबतीत आपण स्त्रीमुक्ती आंदोलन, स्त्रियांना कायदेशीर संरक्षण, राखीव जागा, स्त्री-पुरुष समान हक बाबतीत आंदोलने / जागृती मोहीम राबवीत असताना पूर्वर्वीपेक्षा जास्त स्त्रीवरील अत्याचाराचे प्रमाण, त्यांच्या असुरक्षिततेबद्दलचे वाढते प्रमाण चिंताजनक झाले आहे.

 

आज आपल्या आया-बहिणी मुक्त संचार करू शकत नाहीत ! असुरक्षिततेचे प्रमाण घटण्याच्या ऐवजी वाढलेले आहे. याचे मूळ कारण म्हणजे वाढता व्यभिचार. व्यभिचार वाढण्याचे कारण काय तर बदलते राहणीमान, आधुनिक विचाराची जीवनशैली, इंद्रियसुखाच्या तृप्तीकरिता व्यभिचार अशी अनेक कारणे आहेत. परस्त्रीबद्दल अभिलाषा निर्माण होणे समाजहिताच्या दृष्टीने योग्य नाही.

परस्त्रीबद्दल आदरयुक्त भावना निर्माण झाली तरच आपण स्त्रियांबद्दल सद्भावना निर्माण करू शकू व त्यातूनच स्त्री ही कोणाची तरी माता, भगिनी, सुकन्या आहे. आपलीही माता, भगिनी, सुकन्या ही स्त्रीच आहे. त्यांच्यावर अत्याचार झालेला जसा सहन होणार नाही, तद्वतच दुसऱ्याचीही माता, भगिनी, सुकन्या आहे हेही मनोमन जाणले पाहिजे. या संदर्भात संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील एक ओळ लाखमोलाचा संदेश देणारी आहे ती आत्मसात करायचा प्रयत्न व्हायला हवा-

 

पराविया नारी माऊली समान । मानिलिया धन काय वेचे ।।

संसारात स्त्रीविना पुरुष व पुरुषाविना स्त्री हे अधुरे आहेत. हे अधुरेपण नाहीसे करण्यासाठी स्त्री-पुरुषांना एकत्र यावे लागते हे नैसर्गिक आहे. एकत्र येण्यासाठी काही नीतिमूल्यांचे पालन करणे गरजेचे आहे. परंतु काही विकृत शक्तींचा प्रभाव मानवी मनावर पडल्याने कमकुवत मनाचा पुरुष/ कामाधीन झालेला जीव चित्तात नाना प्रकारच्या वासना घेऊन फिरत असतो. या वासनेतून जसे विविध विकार निर्माण होतात तद्वतच काही वेळा परस्त्री अभिलाषा निर्माण होते. यातून अनर्थच घडतो.

या संदर्भात संत रामदास स्वामी दासबोधात प्रबोधन करताना म्हणतात-

जेथे वासना झोंबोन पडे ।
तेणे चि अपाय दुःख जडे ।
म्हणौनि विषय वासना मोडे ।
तो येक सुखी ।।

परंतु अज्ञानामुळे विषयसुखात किंवा इंद्रियाच्या भोग विलासात रममाण
होणाऱ्यांकडून परस्त्रीची अवहेलना होऊन त्याच्याकरवी स्त्रींवर, मुलींवर अत्याचार होत आहेत.

 

अशा बातम्या आपल्याला सुन्न करणार्या आहेत. मानसिक विकृती, व्यभिचार, एकतर्फी प्रेम, लग्नाचे आमिष, विनयभंग, नैराश्य ही कारणे जरी असलीतरी यासुद्धा गोष्टी का घडतात यावर कुटुंबातील व्यक्तींबरोबर समाजातील घटकांनी विचार करावा असे वाटते.

काही वेळा प्रेमात आमिषाला बळी पडून हे प्रमाण वाढत तर नाही ना (!) असं वाटतं! याचा गांभीर्याने विचार करायला हवा.

हल्ली प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा घटना वारंवार घडत असतात. यावेळी मुलींनी/महिलांनी सावधगिरी बाळगायला हवीच. आपले आईवडील हेच खरं तर पहिले रक्षक आहेत. त्यांचा आदर राखून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण जीवनाची वाटचाल केली तर असे दुर्देवी घटना नक्कीच कमी होतील. कारण आईवडील हेच आपल्याला गैरमार्गाने जाण्यापूर्वी सतर्क करतात हे विसरायला नको. हल्ली लिव्ह ईन रिलेशनशिप प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. खरं तर आपली संस्कृती नाही. यातून अघटित घटना घडत असतात. कुटुंबातील सदस्यांना सुध्दा याची झळ बसते. समाजावर विपरीत परिणाम सुध्दा होतात !

 

खरं तर फक्त मुलींनी/स्त्रियांनीच सतर्क रहावे हे म्हणनं असं नाही तर त्याच बरोबर एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलांनी, व्यक्तींनी सुध्दा विचार करायला हवा की आपल्या अविचारी, व्यभिचारी कृत्यांमुळे कोणाचे जीवन उध्वस्त होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, कोणा मुलींचं, स्त्रियांच जीवन विस्कळीत करणं, उध्दवस्त करणं हे कदापि सहन होणार नाही. एकतर्फी प्रेमातून विकृत कृत्य टाळावीत.

शासनकर्ते, पोलीस यंत्रणा अशा घडू नये म्हणून कार्यरत राहतील, परंतु आपल्या मानसिक विकृती मधून त्यांच्यावर होणारा ताण कमी करण्यासाठी आपण सुद्धा अशा मनःस्थितीत बिघडवणार्या घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत.

 

शेवटी एक मुलगी, स्त्री कोणाची तरी मुलगी, पत्नी, आई असू शकते ! त्यांच्या जीवनात विष कालवायचे काम करू नये. तरच अत्याचाराचे प्रमाण आपण कमी करू शकू किंबहुना पूर्ण पणे टाळू शकु.

सुधीर मेथेकर
पुणे