साहित्य सम्राट संस्था ही साहित्यातून वैचारिक समाज परिवर्तनाचे अथक कार्य करत आहे. हे करून घेणे त्या भगवंताचेच उद्दिष्टं आहे. असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
साहित्यसम्राट पुणे या संस्थेने यावर्षी दहावी वार्षिक साहित्यिक श्रावण सहल रांजणगाव, राळेगणसिद्धी, निळोबाराय मंदिर, चुंबळेश्वर डोंगर आणि जातेगाव या ठिकाणी आयोजित केली होती. त्यावेळी भेटी दरम्यान अण्णा हजारे बोलत होते.
प्रथम श्रीक्षेत्र रांजणगाव महागणपतीचे दर्शन, राळेगणसिद्धी या आदर्श गावाला भेट. संत निळोबारायांचे महात्मे. नंतर चुंबळेश्वराच्या निसर्गरम्य डोंगरावर साहित्यिकांचा निसर्गाशी मनमोकळा संवाद. पुढे चुंबळेश्वराच्या उंच हवेशीर मनमोहक परिसरात पंगतीचा पुरेपूर आस्वाद आणि शेवटी जातेगाव येथील स्वयंभू काळभैरव मंदिरामध्ये १९१ वे कवी संमेलन अभ्यासक नवनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जल्लोषात पार पाडले.
यावेळी कवितेतून सामाजिक क्रांती व्हावी कारण कविते शिवाय समाज जगू शकत नाही. संतांनी आणि महामानवांनी आपल्या लेखणीतूनच समाज घडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कविता ही आपल्या जीवनाचा भाग बनली पाहिजे. असे अध्यक्षीय भाषणात शिंदे यांनी विचार व्यक्त केले.
बहारदार कवी संमेलनामध्ये स्त्रियावरील अत्याचार, निसर्ग, धार्मिक, प्रेम, हास्य आणि प्रबोधनात्मक अशा विषयावर भाष्य करणाऱ्या कविता कवी कवयित्री यांनी सादर करून काव्य रसिक आणि ग्रामस्थांची वाहवा मिळवली. कवी संमेलनाची सुरुवात हिंदी मराठी गीते गाऊन झाली. राहुल जाधव, प्रल्हाद शिंदे, दत्तू ठोकळे, रूपाली भोरकडे, आत्माराम हारे, बाळासाहेब गिरी, दिनेश गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेथेकर, ॲड.अमोल दौंडकर, पत्रकार दीपक वाघमारे, अर्चना अष्टुळ, अलका जोगदंड, ॲड.महेंद्र गायकवाड, रफिक इनामदार, महाबली मिसाळ, राजाराम अडसूळ, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामूगडे, आनंद गायकवाड, ऋतुजा गाडेकर, संदीप कामठे, विनोद अष्टुळ इत्यादी उपस्थित चाळीस कवी कवयित्री यांनी आपल्या स्वलिखित गझल आणि कविता सादर केल्या.
या साहित्यिक सहल कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी, सूत्रसंचालन अलका जोशी यांनी तर सूर्यकांत नामूगडे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.