पुणे, 29 ऑगस्ट 2024: अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भारताचे सुप्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शारीरिक सुदृढता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्दिष्ट विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे तसेच शारीरिक सुदृढतेचे महत्त्व अधोरेखित करणे होते.
शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. शारीरिक तपासणीमध्ये रक्तदाब, हृदयाचे. दर, शरीरातील मेदाचे प्रमाण, दोन्ही हातातील स्नायूंची ताकद, वजन, उंची, पाठीच्या मनक्याची लवचिकता, डोळ्यांची परिधिय दृष्टी या बाबींची तपासणी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की, “शिक्षक व विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य टिकवणे हे त्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. अशा शिबिरामुळे विद्यार्थी आपले आरोग्य नीट पाहू शकतील आणि भविष्यात अधिक जबाबदारीने आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करतील”
या शिबिराचे आयोजन महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचे स्मरण करून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिमान व्यक्त केला. सदर कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य डॉ.शुभांगी औटी, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.प्रितम ओव्हाळ, प्रा.अनिल दाहोत्रे, डॉ.सुनीता दनाई, डॉ.राजेश रसाळ, कॅप्टन धिरज देशमुख, राष्ट्रीय खेळाडू विशाल कोलते उपस्थित होते.