पुणे

पगार देत नाही, तुम्हाला मारून टाकतो, म्हणत मालकासह पत्नीला मारहाण

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

लोणी काळभोर- कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गुजर वस्ती परिसरात कामाचा पगार न दिल्याने गाडी मालकाच्या घरात घुसून चालकाने गाडी मालकासह त्याच्या पत्नीला शिवीगाळ व मारहाण करून घरातील रोख रकमेसह पर्स व मोबाईल घेऊन पळून गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष राजेंद्रप्रसाद भोजनवाल (वय. ३१, रा. नुरपुर बुटाट, गांधीनगर, मुबारकपुर, आजमगढ, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सुनिल रोहीदास सोनोने (वय.४५, गुजरवस्ती, कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिल सोनोने यांचा टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर त्यांच्या गाडीवर आशिष भोजनवाल हा चालक म्हणून काम करीत आहे. आशिष भोजनवाल यांचे गाडीमालक सोनोने यांच्याकडे पगाराचे पैसे थकले होते.

आशिष भोजनवाल याने गाडीमालक सुनिल सोनोने यांच्या घरामध्ये बेकायदेशीर प्रवेश केला. आणि अरेरावीच्या भाषा करून पगाराचे पैसे मागु लागला. पगाराच्या पैशाच्या वादातून आशिष भोजनवाल याने फिर्यादी सोनोने यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच त्यावेळी फिर्यादीची पत्नी मीना या भांडण सोडवण्यास आल्या असता, भोजनवाल याने त्यांनाही हाताने मारहाण करुन ढकलुन दिले. या गोंधळामुळे आजुबाजुचे लोक जमले होते. भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादी सोनोने यांचे शेजारी कुमार शितोळे हे भांडण सोडवण्यासाठी तेथे आले. शितोळे यांनी आशिष भोजनवाल याला बाजुला घेवून भांडण सोडवले.

फिर्यादी सोनोने यांची पत्नी मीना या त्यांच्या आईच्या उपचारासाठी औरंगाबाद येथे जाणार होत्या. त्यामुळे त्यांनी पर्समध्ये पंधरा हजार रुपये ठेवले होते, व ती पर्स घरातील शिलाई मशीनवरती ठेवली होती. पगार न दिल्याने भोजनवाल याने मोबाईल व पैसे ठेवलेली पर्स घेऊन पळून गेला. याप्रकरणी सोनोने यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालक आशिष भोजनवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश कुंभार करीत आहेत.