पुणे

ज्येष्ठाचे अपहरण करून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा हडपसर पोलिसांत तक्रार ः मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही केल्याचे कारण

पुणे : बहिणीच्या सासूबाईच्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही केल्याने अपहरण करुन मारहाण करणाऱ्या सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोपट बबन शेंडकर (वय ५५, रा. फातिमानगर), सौरभ पोपट शेंडकर (वय २४), सुनील किसन शेंडकर (वय ४१, रा. फातिमानगर), समीर रामदास शेंडकर (वय ३८, रा. आझादनगर, वानवडी), गणेश रामदास शेंडकर (वय ३३), महेश दत्तात्रय शेंडकर (वय ३३), विघ्नेश ज्ञानेश्वर शेंडकर (वय १९, रा. धाडगेनगर, फातिमानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दिलीप बबन इंगळे (वय ५६, रा. काळे पडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ४ जून २०२४ रोजी रात्री दहा वाजता घडला होता.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची बहिण सुशिला जयसिंग शेंडकर यांच्या सासूबाई तुळसाबाई बबन शेंडकर यांनी महम्मदवाडी येथील ६ गुंठे जागेचे मृत्युपत्र तयार केले.

त्यात ही जागा जयसिंग शेंडकर याच्या नावे केली. या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून फिर्यादी यांनी सही केली होती. जयसिंग शेंडकर याने ही जागा तुळसाबाई शेंडकर यांना फसवून घेतली असल्याचे आरोपींचे म्हणणे आहे.

त्यामुळे फिर्यादी यांना साडेसतरानळी येथील साईटवरुन आरोपींनी जबरदस्तीने इर्टिगा कार मध्ये बसविले. त्यांचे अपहरण करुन त्यांना जयसिंग शेंडकर यांच्या घरी नेले. तेथे त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात फिर्यादीच्या पाठीला व मणक्याला दुखापत झाली. फिर्यादीचे दाजी जयसिंग शेंडकर यांनाही मारहाण केली़ त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हाईस रेकॉर्डींग त्यांनी डिलिट करुन मोबाईल फोडला. सहायक पोलीस निरीक्षक हसिना शिकलगार तपास करीत आहेत.