हडपसर / पुणे (प्रतिनिधी )
राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर विद्यमान आमदारांनी अजित पवारांसमवेत जाण्याचा निर्णय घेतला, शरद पवारांच्या पक्षाला मोठे खिंडार पडलेले असताना असताना एकाकी खिंड लढविणाऱ्या कार्यकर्त्यास विधानसभेवर पाठविण्याच्या हालचाली सूरु झाल्या, हडपसर मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी डाव टाकले असून गणेशोत्सवामध्ये जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यामुळे विद्यमान आमदारांच्या अडचणीत वाढ झाल्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर हडपसर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्यासह माजी नगरसेवकांनी अजित पवार यांना साथ दिली, लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडी पाहता काही माजी नगरसेवकांनी पुन्हा घरवापसी केली, डॉ. अमोल कोल्हे चांगल्या मताधिक्य मिळवून पुन्हा लोकसभेवर निवडून गेले, शरद पवार अडचणीत असताना माजी महापौर प्रशांत जगताप यांनी एकाकी किल्ला लढवीला व सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यास यशस्वी ठरले.
जगताप यांची निष्ठा व पुण्यात पक्षाची धुरा यशस्वी संभाळल्याने शरद पवारांनी त्यांना हडपसर मधून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले. शिवस्वराज्य यात्रा, जयंत पाटलांचे दौरे, खा. सुप्रिया सुळे यांचे विशेष लक्ष असलेल्या हडपसर मतदारसंघात पुन्हा पक्षबांधणी जोमाने झाली, त्यात डॉ.अमोल कोल्हे पुन्हा खासदार झाल्याने पक्ष कार्यकर्त्यांच्या आशा वाढल्या, राजकीय वारे बदलू लागल्याने विद्यमान आमदारांनी उद्योजक व मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून घरवापसी साठी प्रयत्न सुरु केले, वडगाव शेरी मधून माजी आमदार बापू पठारे यांची घरवापसी होत असताना हडपसरच्या आमदारांना मात्र रेड सिग्नलच पहावा लागला, अडचणीच्या काळात प्रशांत जगताप यांना न्याय देण्यासाठी पवारांनी येथे विद्यमान आमदार, काँग्रेसचे माजी मंत्री, शिवसेनेचे माजी आमदार यांना वेटिंगवरच ठेवले.
हडपसर मधून निष्ठावंत शिलेदारास न्याय देण्याची भूमिका
लोकसभा निवडणुकीत महाविकासआघाडीच्या यशाचे केंद्रबिंदू शरद पवार ठरले, आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात पवारांच्या पक्षात अनेकांचा प्रवेश होत आहे पण सरसकट प्रवेश न देता निष्ठावंतांना न्याय देण्याची भूमिका पवारांनी ठेवली आहे, त्यात हडपसर मतदारसंघाचा समावेश आहे, आमदार तुपे यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही प्रशांत जगताप यांना ग्रीन सिग्नल दिल्याने वस्ताद मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय धुरीन बोलत आहेत.
शरद पवार ‘ठरवतात’ हडपसरचा आमदार
अपवाद वगळता हडपसर विधानसभा मतदारसंघाचा आमदार शरद पवार सांगतील तोच होतो, स्व.विठ्ठल तुपे, बाळासाहेब शिवरकर, चेतन तुपे यांच्या आमदार होण्यात पवारांचा वाटा मोलाचा होता. हडपसरची जनता साहेबांच्या शब्दाला मान देऊन मतदान करतात त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राजकारणातील ‘वस्ताद’ डाव टाकून निष्ठावंत शिलेदारास निवडून आणून सत्तेत महत्वाचे पद देणार असल्याची चर्चा हडपसर मतदारसंघात रंगली आहे.