पुणे – पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील टप्पा ३ बॅच-२ मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांना मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने खेड तालुक्यातील चाकण ते रोहकल, खेड, सातकरस्थळ, बहिरवाडी, बुट्टेवाडी ते मिरजेवाडी आणि शिरुर तालुक्यातील प्रजिमा ११५ ते पिंपरी दुमाला, वाघाळे, वरुडे, खैरेवाडी, धामारी ते करंदी राज्यमार्ग ११७ या रस्त्यांच्या कामांसाठी रु. २२ कोटी ६४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
मागच्या पंचवार्षिकमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या कामांच्या प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेऊन कामे मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे यांनी सुचविलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर व हवेली तालुक्यातील २० पैकी १६ कामांना मंजुरी देण्यात आली होती. उर्वरीत कामे पुढच्या बॅचमध्ये मंजूर करण्याचे आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा प्रस्ताव छाननीअंती केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली.
खासदार डॉ. कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे खेड तालुक्यातील रा.म.५० (जुना रा. म. ६०) चाकण ते रोहकल रस्त्यावर व्हाईट टॉपिंग करुन ३.७५ मीटर रुंदीनुसार सुधारणा करणे या ५.३५० कि.मी. लांबीसाठी रु. ४३७.३८ लक्ष, खेड, सातकरस्थळ, बहिरवाडी, बुट्टेवाडी ते मिरजेवाडी या रस्त्यावर व्हाईट टॉपिंग करुन ३.७५ मी. रुंदीनुसार ६.७७५ कि.मी. रस्त्यासाठी रु. ६३२.९६ लक्ष आणि शिरुर तालुक्यातील प्रजिमा ११५ पिंपरी दुमाला ते वाघाळे, वरुडे, खैरेवाडी, धामारी, करंदी ते राज्यमार्ग ११७ या रस्त्यावर व्हाईट टॉपिंग करुन ३.७५ रुंदीनुसार ११.७७५ कि.मी. रस्त्यासाठी रु. ११९४.२९ लक्ष अशा सुमारे २२ कोटी ६४ लक्ष रकमेच्या कामांना मंजुरी मिळाली असून येत्या काही महिन्यात या कामांची निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.
या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, मागच्या टप्प्यात सर्वच कामे मंजूर होणे अपेक्षित होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ही कामे मंजूर झाली नव्हती. मात्र या कामांचा पाठपुरावा सुरूच होता. आता ही कामे मंजूर झाल्याने जनतेला चांगले रस्ते उपलब्ध होतील. विकासकामांसाठीचे माझे प्रयत्न यशस्वी होत असल्याने मतदारसंघातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करता येत आहेत, याचा मला आनंद आहे. पुढील काळात अशाचप्रकारे विकासकामे करुन मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.