फुरसुंगी प्रतिनिधी (संजय ओसवाल)
फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निर्मितीचा सस्पेन्स आता कायमचा संपला असून राज्यपालांच्या अनुमतीने नगरविकास विभागाने अखेरची अधिसूचना जारी केली आहे. नव्याने अस्तित्वात आलेली ही नगरपरिषद देशातील सर्वात श्रीमंत आणि विकसित नगरपरिषद म्हणून नावारूपाला येईल याची मला खात्री आहे. दोनही गावातील नागरिकांच्या दृष्टीने हा जसा आनंदादायी निर्णय आहे तसाच माझ्याही राजकीय कारकिर्दीतील तो मैलाचा दगड आहे. दोनही गावातील नागरिक आणि नगरपरिषद प्रशासन परस्पर सहकार्यातून हा परिसर समृद्ध करतील असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
शिवतारे पुढे म्हणाले, दोन्ही गावाच्या नागरिकांनी सगळ्या राजकीय नेत्यांचा अनुभव घेतल्यानंतर संयुक्त ग्रामसभा घेत माझ्यावर विश्वास टाकला. तो सार्थ ठरवू शकल्याचा मला आनंद आहे. ७५ हजारहून अधिक लोकसंख्या असल्याने ही नगरपरिषद अ वर्ग दर्जाची होईल असेही ते म्हणाले. करआकारणीबाबत मनपाने घेतलेली ताठर भूमिका समाविष्ठ गावांना पटण्यासारखी नाही. पुण्यातल्या लक्ष्मीरोड सारखी कर आकारणी जर नवीन गावांमध्ये करणार असाल तर लोकांचा प्रक्षोभ होणे साहजिक आहे. उर्वरित गावांमध्ये ग्रामपंचायत कराच्या दुपटीपेक्षा अधिक कर घेऊ नये असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्या गावांसाठीही मी लढा देणार आहे.
नगरपरिषदच का याबाबत बोलताना शिवतारे म्हणाले, पुण्याची आजची स्थिती चिंताजनक आहे. खराब रस्त्यांनी पुणेकर हैराण आहेत. झोपडपट्ट्याचं वाढलेलं साम्राज्य, तासनतास होणारी वाहतूक कोंडी, मनपा प्रशासनाचा मनमानीपणा, अतिक्रमणांचा विळखा यामुळे शहर आधीच जर्जर झालेलं आहे. शहराचा प्रचंड डोलारा सांभाळण्यास मनपा प्रशासन सक्षम नाही. त्यामुळे शहराच्या आजूबाजूला आणखी अशा स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करणे हाच त्यावरील उपाय आहे.
“मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा यात मोलाचा वाटा आहे. त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री अजित दादा पवार या दोघांचेही मी या निमित्ताने आभार मानतो. जनतेला दिलेला शब्द मी पूर्ण केला आहे. टॅक्सच्या वरवंट्यामधून आज सर्वसामान्य माणसाची मुक्तता झाली आहे.