पुणे

‘वस्तादांचा’ भाजपला धक्का, माजी आमदारांची तुतारी हातात घेत घरवापसी, बापू पठारे समर्थक नगरसेवकांसह शरद पवारांच्या पक्षात

पुणे – वडगावशेरी मतदार संघाचे प्रथम आमदार बापू पठारे यांनी चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आज प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार बापू पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात केलेला प्रवेश महत्त्वाचा मानलेला जात आहे.

मागील विधानसभा ऐन निवडणुकीत बापू पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असणारे बापू पठारे यांनी सरपंच ते आमदार असं संपूर्ण प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेला आहे. पुणे महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष तसेच वडगाव शेरी मतदार संघाचे प्रथम आमदार म्हणून त्यांनी काम केलेले आहे. मागील दोन वर्षांपासून पठारे कुटुंबीयांकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे वडगाव शेरी मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून त्यांना किंवा त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बापू पठारे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलेले होते. अखेर अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांना विराम देत माजी आमदार बापू पठारे हे स्वगृही परत आलेले आहेत. या प्रवेशाच्या वेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे, महादेव पठारे,ऍड.भैय्यासाहेब जाधव यांनी देखील राष्ट्रवादी शरदचंद्र गटात प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी शरच्चंद्र पवार गटाचे वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष आशिष माने, कार्याध्यक्ष शैलेश राजगुरू उपस्थित होते.