पुणेमुंबई

फळबाग लागवडीला मिळणार शासनाची साथ, शेतकऱ्यांचा होणार खऱ्या अर्थाने विकास

भारत हा कृषीप्रधान देश असल्याचं आपण कायमच ऐकत आलो आहोत. देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा आणि खासकरुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी सातत्याने नवनवीन योजना आणत आहे.

महाराष्ट्रात कित्येक शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन पुढे आले आहे. यासाठी शासनाने “फळबाग लागवड योजना” सुरू केली होती. ही योजना आता २०२४-२५ मध्ये सुधारित रुपात कायम ठेवण्यात आली आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील फळबाग लागवड करता येणार आहे.

काय होणार फायदा?

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी तीन टप्प्यांमध्ये अनुदान मिळणार आहे. तसेच ठिबक सिंचन बसवण्यासाठी राज्य सरकार १०० टक्के अनुदान देणार आहे. यासोबतच खड्डे खोदणे, कलम लागवड, पीक संरक्षण आणि नांग्या भरणे अशा कामांसाठी देखील शासन पूर्ण अनुदान देणार आहे.

राज्यातील 80% शेतकऱ्यांना होणार फायदा

यापूर्वीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारण करणारे अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीकरता अनुदानास पात्र होते. यासाठी दोन हेक्टर जमिनीची मर्यादा आहे. मात्र यानंतर देखील राज्यातील सुमारे ८० टक्के शेतकरी जॉबकार्ड नसल्याने या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरत होते. राज्य शासनाची फळबाग लागवड योजना ही अशा शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. अर्थात, महात्मा गांधी ग्राहयो अंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळवणारे शेतकरी देखील त्या योजनेंतर्गत फळबाग लागवड केलेले क्षेत्र वगळता इतर क्षेत्रामध्ये लाभ घेण्यास पात्र ठरतील.

ही योजना शेतकऱ्यांच्या उत्त्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने फायद्याची ठरणार आहे. फळबागेच्या रुपाने शेतकऱ्यांना एक शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल. शिवाय फळबाग लागवड केल्यामुळे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन होईल. या माध्यमातून हवामान बदल आणि ऋतू बदलाची दाहकता कमी होण्यास खारीचा वाटा उचलता येणार आहे.

या योजनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी https://mahaegs.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.