पुणेमहाराष्ट्र

आंबेगाव आणि फुरसुंगीला स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर – माजी राज्यमंत्री विजय शिवतारे

पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील आंबेगाव आणि फुरसुंगी या दोन ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर करण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. हवेली तालुक्यातील ही दोन मोठी गावे असून येथील लोकसंख्या गेल्या काही कालावधीत प्रचंड वाढली आहे. त्यामुळे येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे शिवतारे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे शिवतारे यांनी आभार मानले.

शिवतारे म्हणाले, नव्याने निर्मित आंबेगाव पोलीस स्टेशनसाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण ९७ पदे मंजूर करण्यात आली आहेत. फुरसुंगी पोलीस स्टेशनसाठी १२१ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई इत्यादी पदांचा समावेश आहे. याशिवाय सफाई कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी १ पद बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे असेही शिवतारे म्हणाले.

शिवतारे पुढे म्हणाले, दोनही गावे ही पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या अधिनिस्त आहेत. आंबेगाव भाग हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत यापूर्वी कार्यरत होता तर फुरसुंगी परिसर हा हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत होता. हडपसर आणि लोणी काळभोर या दोन पोलीस स्टेशनचे विभाजन करून फुरसुंगी पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. दोनही पोलीस स्टेशनची हद्दनिश्चिती लवकरच करण्यात येईल असेही शिवतारे यांनी सांगितले आहे. लोकसंख्या वाढीशिवाय धार्मिक स्थळांची सुरक्षा, निवडणुका, व्हीआयपी लोकांचे दौरे, पर्यटन इत्यादी कारणांमुळे पोलीस खात्यावर मोठा ताण होता. विभाजनामुळे आणि नवीन पोलीस स्टेशनच्या निर्मितीमुळे हा ताण कमी होईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल असे शिवतारे म्हणाले.