पुणे

स्वारगेट ते खडकवासला मेट्रो सेवा मंजूर केल्याबद्दल खा. सुळेंनी मानले शासनाचे आभार वाहतुक सुविधेसाठी २०१८ मध्येच केली होती मागणी

पुणे : पर्यटनाच्या दृष्टीने सिंहगड पायथा, खडकवासला आदी परिसराचे महत्व लक्षात घेता खडकवासला ते स्वारगेट ही मेट्रो मार्गिका सुरु करावी अशी मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने हा मार्ग मंजूर केला आहे. दरम्यान, ही मागणी मंजूर केल्याबद्दल सुळे यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

पुणे शहरात मेट्रोसेवा सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर या सेवेचा पर्यटकांसाठी चांगला उपयोग होऊ शकतो, हे लक्षात घेऊन सुळे यांनी स्वारगेट ते खडकवासला दरम्यान मेट्रो सुरू व्हावी यासाठी २०१८ पासून पाठपुरावा सुरु केला होता. हा मार्ग खडकवासला पर्यंत जरी मंजूर झालेला असला तरी तो सिंहगड पायथ्यापर्यंत घेऊन जावा अशीही मागणी नागरीकांकडून होत आहे.

पुणे शहरातून खडकवासला, सिंहगड, पानशेत, वरसगाव, निळकंठेश्वर आदी पर्यटन स्थळी जाण्यासाठी सध्या पीएमपीएमएल किंवा एसटी या दोनच सुविधा आहेत. याशिवाय अन्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रणात या भागात जाणाऱ्या पर्यटकांना रिक्षा आणि अन्य खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. परिणामी वाहतूक कोंडीचा नेहमीच सामना करावा लागतो. हे पाहता मेट्रो सुरू झाली, तर पर्यटकांना तर फायदा होईलच, शिवाय या भागात जाणाऱ्या खासगी वाहनांची संख्या सुद्धा कमी होऊन वाहतूक कोंडी काही अंशी टाळता येईल, असे त्यांनी सुचवले होते.

अखेर या मागणीला राज्य मंत्रीमंडळाने आज मंजूरी दिली. त्यानंतर हा मार्ग लवकरात लवकर पुर्ण होऊन तो नागरीकांच्या सेवेत रुजू होईल हा विश्वास असून ही सेवा मंजूर केल्याबद्दल सुळे यांनी शासनाचे आभार मानले आहेत. दरम्यान, हा मार्ग खडकवासला ते स्वारगेट दरम्यान कॅनॉलच्या मार्गालगत घेऊन जावा अशी मागणी नागरीकांकडून होत आहे. हा मार्ग राज्य शासनाच्या अखत्यारीत असून यामुळे जागेचे वेगळे अधिग्रहण करण्याची वेळ येणार नाही असेही नागरीकांचे मत आहे.