कोकण विभाग

चिपळूण वाशिष्ठी नदी दुर्घटना: राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेतून दोन विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १.५लाखांची मदत आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

चिपळूण/ प्रतिनिधी: चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे ८ जुलै २०२३ रोजी वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या कुटुंबांना, राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत प्रत्येकी १.५ लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. अतिक इरफान बेबल (वय १६) आणि अब्दुल कादीर लसने (वय १७) ही दोन्ही मुले वाशिष्ठी नदीत पोहण्यासाठी गेली असता, मोठ्या डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला होता.

या दुर्दैवी घटनेनंतर मुलांच्या कुटुंबांची गंभीर आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेऊन मदत मिळविण्यासाठी पर्याय विचारत त्याचे मार्गदर्शन घेतले व सततचा पाठपुरावा केला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी १.५ लाख रुपये आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. हे आर्थिक सहाय्यक मिळवून देता आले याचे आमदार शेखर निकम यांना समाधान प्राप्त झाले.

शासनाच्या या सहकार्यामुळे दोन्ही कुटुंबांना दिलासा मिळाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील इतर अपघातग्रस्त कुटुंबांनाही याचा फायदा झाला. आमदार शेखर निकम यांनी महायुती शासनाचे आणि संबंधित विभागांचे आभार मानले आहेत.