हडपसर (प्रतिनिधी)
हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चेतन तुपे यांना उमेदवारी दिल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक आयोजित केली होती. 29 ऑकटोबर पर्यंत महायुती उमेदवारीसाठी वेट अँड वॉच भूमिका असून उमेदवारी अर्ज घेतल्याने भानगिरे काय भूमिका घेतात यावर महायुती उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातून शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे हे इच्छुक उमेदवार होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने विद्यमान आमदार चेतन तुपे यांची उमेदवारी जाहीर केली, उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या भानगरींचे कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली, पुणे पासून मुंबई पर्यंत चालत जाऊन भानगिरे यांनाच उमेदवारी द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. विद्यमान आमदार अजित पवार गटाचा असल्याने त्यांच्याच पक्षाला येथील जागा सुटणार अशी चर्चा सुरू झाली. विद्यमान आमदार चेतन तुपे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर शिवसैनिक आक्रमक झाले, प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली.
यावेळी शेकडो पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा हडपसर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार हा शिवसेनेचाच असावा अशी आग्रही भूमिका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत येत्या दोनच दिवसात भेट घेवून मांडणार आहेत, यासाठी येत्या 29 ऑकटोबर पर्यंत सर्व प्रमुख पदाधिकारी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून कोणत्याही परिस्थितीत हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचाच आमदार व्हावा ही आग्रही भूमिका यावेळी शिवसेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
हडपसर मतदारसंघ शिवसेनेकडे रहावा आग्रह कायम…
हडपसर विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मोठी तयारी केली असून शहरात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी हडपसर मिळावा यासाठी आग्रह केला होता, राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर झाली असली तरी अद्याप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना अशा असून 29 ऑक्टोबर पर्यंत वाट बघून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
प्रमोद नाना भानगिरे
शहरप्रमुख –
शिवसेना पुणे