चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून महायुतीकडून राष्ट्रवादी अजितदादा गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. शक्तीप्रदर्शन करीत महायुतीने एकजुटीचे दर्शन घडवले.
सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला, नगर पालिका येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथील आश्वारुड शिवपुतळ्याला आमदार शेखर निकम यांनी अभिवादन केले. यानंतर रॅलीने चिंचनाका, मध्यवर्ती बस स्थानक, पॉवर हाऊस, महामार्गमार्गे येऊन प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार सुनिल तटकरे, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी सभापती शौकत मुकादम आदी उपस्थित होते.
जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आमदार शेखर निकम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये वारकरी मंडळींनी भजनाचा ठेका धरला, हलगी वाजत होती, ढोल पथक लक्ष वेधून घेत होते. अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना शहर प्रमुख उमेश सपकाळ, भाजपचे नेते रामदास राणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबू ठसाळे, शिंदे गट सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, खेर्डीचे माजी सरपंच अनिल दाभोळकर, राष्ट्रवादी भाजपचे दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपचे देवरुखमधील नेते प्रमोद अधटराव, माजी सभापती पूजा निकम, चित्राताई चव्हाण, जिल्हा बँक संचालिका दिशा दाभोळकर, मुक्ता निकम, माजी नगरसेविका शिवानी पवार, अदिती देशपांडे, स्वाती दांडेकर, माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, जिल्हा बँक संचालक राजू सुर्वे, उदय ओतारी, किशोर रेडीज, पूनम भोजने, इम्रान कोंडकरी, ज्येष्ठ नेते दादा साळवी, आरपीआयचे राजू जाधव, डॉ. राकेश चाळके, रुपेश कदम यांच्यासह राष्ट्रवादी अजितदादा गट, शिवसेना शिंदे गट, भाजप, आरपीआय आदी मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना माजी सभापती शौकत मुकादम यांनी, अर्ज भरण्यासाठी झालेली गर्दी पाहून आमदार शेखर निकम यांचा विजय एक हजार एक टक्के होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. आजची ही गर्दी विजयाची मुहुर्तमेढ रोवण्यासारखी आहे. आता गावागावात जाऊन महायुतीचे सरकार आणण्यासाठी सर्वांनी काम करा. लाडक्या बहिणींनी लाडका भाऊ आमदार शेखर निकम यांच्यासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपचे दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आमदार शेखर निकम यांनी आमदार झाल्यानंतर मतदार संघात प्रेम वाटलं. आज मोठ्या गर्दीने आपण सर्व त्यांचे आभार मानण्यासाठी आलात, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ऑक्टोबर हिट असताना, अंगाची लाही लाही होत असताना आपल्या लाडक्या नेत्याचा अर्ज भरण्यासाठी तुम्ही सकाळपासून गर्दीने आलात. 20 नोव्हेंबरला असेच प्रेम कायम ठेवा, पुढची पाच वर्षे आमदार शेखर निकम तुमची काळजी घेतील. स्व. गोविंदराव निकम यांच्यापासून आमदार शेखर निकम काम करीत आहेत. सुरुवातीला त्यांना विधानसभा निवडणुकीला यश आलं नाही, परंतु 2019ला विजयी झाल्यानंतर त्यांनी खूप मोठे काम मतदार संघात केलं आहे. आपल्याला प्रामाणिक नेता मिळाला आहे, आपण सारे भाग्यवान आहोत, अशी भावनाही राजेश सावंत यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर महायुतीच्या सरकारमध्ये आमदार शेखर निकम मंत्री होतील, येत्या 23 तारखेला आपण त्यांच्या विजयाचा गुलाल उधळू, असेही ते म्हणाले. प्रत्येकाला भेटायला शेखर सर येतील, असं नाही. पाच वर्षे त्यांनी सर्वांशी संवाद ठेवला आहे. प्रत्येक भागात तुम्हीच शेखर निकम आहात असे समजून काम करा, असेही राजेश सावंत म्हणाले.