पुणे

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, बनकरफाटा, जुन्नर, घोडेगाव, भीमाशंकर, तळेघर, वाडा ते राजगुरुनगर रस्त्यांसाठी २३४९.३२ कोटींचा निधी मंजूर

नारायणगाव – छत्रपती शिवाजी महाराजाचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी, ओझर व लेण्याद्रीचे अष्टविनायक देवस्थान आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या बनकरफाटा, जुन्नर, घोडेगाव ते तळेघर (NH 61) आणि तळेघर, भीमाशंकर, वाडा, चास ते राजगुरुनगर (NH 60) या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व पुनर्बांधणी करण्याची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी मान्य करीत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी २३४९.३२ कोटींचा निधी मंजूर केला.

शिरूर लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या बनकरफाटा, जुन्नर, घोडेगाव ते तळेघर (NH 61) आणि तळेघर, भीमाशंकर, वाडा, चास ते राजगुरुनगर (NH 60) या भक्ती-शक्ती मार्गाला मंजुरी देण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यामुळेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या दोन्ही रस्त्यांना महामार्गाचा दर्जा दिला होता.

 

राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्याचा व्यवहार्यता तपासणी व सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला होता. हा रस्ता झाल्यास शिरूर लोकसभा मतदारसंघातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळे जोडली जाणार असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल या भूमिकेतून खासदार डॉ. कोल्हे यांनी या रस्त्यासाठी केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. या रस्त्यांसाठी रु.२३४९.३२ कोटींचा निधी मंजूर केल्याचे गडकरी यांनी जाहीर केले.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या भक्ती-शक्ती कॉरिडॉरची उभारणी व्हावी, या मागणीसाठी केंद्रीयमंत्री गडकरी यांची नुकतीच भेट घेतली होती. त्याला केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या कामांसाठी निधी मंजूर केला. या दोन्ही रस्त्यांची कामे झाल्यावर पर्यटनाला चालना मिळेलच, शिवाय दुर्गम आदिवासी भागातील रस्ते वाहतूक दळणवळण यंत्रणा सक्षम होऊन या भागाच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी सांगितले.
या रस्त्यांसाठी इतका मोठा निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीयमंत्री गडकरी यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करीत खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, दोन मार्गिकांचे रूंदीकरण, पुनर्बांधणी व अपग्रेडींगचे काम होणार असून या भागातील जनतेसाठी चांगले रस्ते व्हावेत, या माझ्या प्रयत्नांना यश मिळाले याबद्दल मनस्वी आनंद होत असल्याचे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले.