पुणे

‘एमआयटी एडीटी’त फिट इंडिया सायकलिंग मोहिम

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

पुणे,दि.१५- येथील एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठात येत्या मंगळवारी (१७ डिसेंबर) फिट इंडिया सायकलिंग मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. विद्यापीठातील तत्वज्ञानी संत श्री. ज्ञानेश्वर विश्‍वशांती घुमटाच्या परिसरातून या मोहिमेची सुरुवात होईल. ज्यात सहभागींना ३,५ आणि १० किलोमीटर प्रकारात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या मोहिमेचे एमआयटी इम्पॅक्ट विद्यार्थी परिषद, भारतीय क्रिडा प्राधिकरण(साई) व लोणी-काळभोर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलेले आहे. जी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “फिटनेस की डोस, आधा घंटा रोज” या संकल्पनेशी सुसंगत आहे.

या मोहिमेला माउंटन ब्रिगेडचे माजी कमांडर आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डचे माजी फोर्स कमांडर ब्रिगेडियर व्ही. महालिंगम (निवृत्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविण्यात येईल. तसेच यावेळी, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डॉ. मंगेश कराड, प्र.कुलगुरू डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, प्रा. डॉ. सुराज भोयर, डॉ. अतुल पाटील, आणि शिवछत्रपती पुरस्कृत पद्माकर फड हेही उपस्थित राहतील.