प्रतिनिधी- स्वप्नील कदम
पुणे- सध्याच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात आपण शाररिक स्वास्थ्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहोत. त्यामुळे, अगदी तारुण्यातील मुलांना हृदयविकाराचे झटके आल्याचे आपण सध्या पाहतो. नोकरी, पैसा, करिअर या सर्व गोष्टी महत्वाच्या आहोतच, मात्र त्याहूनही शारीरिक स्वास्थ्य अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे, तरुणांनी विद्यार्थी दशेतच सायकलींग करून व्यायामाची आवड जोपासल्यास त्यांचे हृदय अधिक बळकट होऊन आयुर्मान वाढण्यास मदत होईल,असे मत, माउंटन ब्रिगेडचे माजी कमांडर तसेच नॅशनल सिक्युरिटी गार्डचे माजी फोर्स कमांडर ब्रिगेडियर व्ही. महालिंगम (निवृत्त) यांनी मांडले.
ते येथील एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठाची एमआयटी इम्पॅक्ट विद्यार्थी परिषद, भारतीय क्रिडा प्राधिकरण (साई) व लोणी-काळभोर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिट इंडिया सायकलिंग मोहिमेच्या शुभारंभा प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, लातूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुभेदार जगन्नाथ लकडे, प्र.कुलगुरू डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, प्रा. डॉ. सुराज भोयर, डॉ. अतुल पाटील, आणि शिवछत्रपती पुरस्कृत पद्माकर फड हेही उपस्थित होते.
सुभेदार लकडे यावेळी बोलताना म्हणाले, फिट इंडिया सायकलिंग मोहिम ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “फिटनेस की डोस, आधा घंटा रोज” या संकल्पनेशी सुसंगत आहे. देशपातळीवर या मोहिमेचे आयोजन करण्यात आले, असून प्रत्येकाने दिवसातील किमान अर्धा तास सायकल चालवल्यास निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली त्यांना जोपासता येवू शकते. एक खेळाडू म्हणून आम्ही कायमच स्वतः शाररिक स्वास्थ्याला प्राधान्य देत असतो, अगदी तशाच प्रकारच्या पद्धतीचा अवलंब सर्वांनी केल्यास प्रत्येकाचे जीवन निरोगी होण्यास मदत होईल.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वज दाखवून ३,५ व १० किमी अशा गटात झालेल्या या मोहिमेत एमआयटी एडीटी विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थ्यांसह लोणी-काळभोर व कदमवाक वस्ती तील ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.