पुणे ः इलेक्ट्रॉनिक वाहन्या, सोशल मीडिया, डिजिटलच्या जमान्यामध्येही विद्यार्थ्यांचे पुस्तकांसह अवांतर वाचन करण्याची गरज आहे. वाचन समृद्ध होण्यासाठी प्रगती विद्यालयात अनोखा उपक्रम सुरू केला आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. नियमित पुस्तके वाचल्याने आपले व्यक्तिमत्व प्रभावी बनते, असे प्रतिपादन पुण्यनगरीचे उपसंपादक डॉक्टर अशोक बालगुडे यांनी केले.
साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या काळेबोराटेनगर येथील प्रगती विद्यालयामध्ये नवीन वर्षाचा शुभेच्छा कार्यक्रम आणि वाचन संस्कृतीच्या लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वाचन संस्कृती वाढण्यासाठी अक्षरसृष्टी संस्थेच्या माध्यमातून सहभागी सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस व लकी ड्रॉ मधील विजेत्या विद्यार्थिनीला आठ हजार रुपयाची सायकल देण्यात आली.
याप्रसंगी मुख्याध्यापिका मीनाक्षी लंगोटे, पुणे शहर मुख्याध्यपक संघाचे दिलीप काळे, कोंढव्यातील शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण ढमाळ, राधाकृष्ण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एम. पाटील, ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाचे पर्यवेक्षक अभय पाटील, महंमदवाडीतील डॉ. दादा गुजर विद्यालयाचे डी. एम. पाटील, साधना विद्यालयाचे राजेंद्र तावरे, शिक्षिका संगीता कोलते, पवार एस बी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका मीनाक्षी लंगोटे म्हणाल्या, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी अनेकविध उपक्रम सुरू आहेत. दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी फटाक्यावरील खर्चाला फाटा देत एक पुस्तक खरेदी करायचे व सुट्टीमध्ये वाचन करून ते विद्यालयात भेट द्यायचे हा उपक्रम ग्रंथालय विभागामार्फत राबवण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला. विद्यालयाचे वतीने नवीन वर्षानिमित्त त्यांच्यासाठी एका लकी ड्रॉमधून विद्यार्थ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार केल्या. त्यातून पाहुण्यांच्या हस्ते त्यांनी काढलेल्या चिठ्ठीतील नाव असलेल्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी सुश्मिता थापा हिला आठ हजार रुपये किमतीची सायकल बक्षीस देण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांनादेखील बक्षीस देण्यात येणार आहेत. अक्षरसृष्टी संस्थेच्या माध्यमातून सायकल व विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार आहे त्यांचे देखील त्यांनी आभार मानले. तसेच, या उपक्रमामध्ये सहभाग म्हणून ज्येष्ठ पत्रकार डॉ. अशोक बालगुडे यांनी प्रधान मास्टर, नरेंद्र मोदी, पॅटर्न शिवरायांचा आणि हिंदू देवीदेवता अशी पाच पुस्तके एक हजार ५० रुपयांची भेट दिली.
ए.बी. पवार यांनी सूत्रसंचालन केले. संगीता कोलते यांनी प्रास्ताविक केले. निर्मला मुदीगोंडा यांनी आभार मानले.