पुणे/प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच महापालिकेच्या निवडणुकांसाठी विविध पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असून विविध विकासकामे घेऊन नागरिकांपर्यंत पोचण्याच प्रयत्न प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे. अशातच हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी, शिवसैनिकांची आढावा बैठक शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुकांसाठी संघटन बांधणी, पक्षाचे धेय्य धोरणे, पक्षाची कामे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्वांनी तन मन लाऊन काम करणे आवश्यक असल्याचे नाना भानगिरे यांनी या बैठकीत सांगितले. त्याचबरोबर पुणे शहरात विविध ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांच्या जोरावर नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मतरुपी आशीर्वाद देत प्रचंड मताधिक्याने निवडून दिले तसेच यामध्ये शिवसैनिकांनी देखील अथक परिश्रम घेतले त्याबद्दल नाना भानगिरे यांनी सर्वांचे आभार मानले. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार केला.
तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीने विधानसभा निवडणुका लढल्या आणि जिंकल्या. लाडकी बहिण योजनेसह विविध योजना जनतेसाठी राबवल्या गेल्या त्याचा लाभही अनेकांना झाला. आगामी महापालिका निवडणुकीत या सर्व योजना आणखी प्रभावीपणे जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत. त्याचबरोबर पुणे शहरात शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील.