परभणीपालघरपिंपरी-चिंचवडपुणेबीडबुलडाणाभंडारा

मांजरीमध्ये एटीएम मशीन फोडणा­ऱ्यास जागेवरच अटक, पोलिसांची धडक कारवाई

पुणे : प्रतिनिधी
मांजरी बु।। (ता. हवेली) येथील घुले वस्तीमध्ये एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर फोडून पैसे पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी सोमवारी (दि. १३) पहाटे अटक केली. त्याने यापूर्वी शहरातील अनेक एटीएम सेंटरमध्ये चोऱ्या केल्या असाव्यात असा पोलिसांचा संशय आहे.

शंभूकुमार श्रीनगेंद्र सिंग महतो (वय २९, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) असे चोरट्याचे नाव आहे. तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यासंदर्भात एटीएम दक्षता विभागाचे अधिकारी हर्षल सुरेंद्र सुतार (रा. आदर्शनगर, उरुळी देवाची) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. हा प्रकार मांजरी बु।। (ता. हवेली) येथील घुले वस्तीमधील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये सोमवारी पहाटे साडेचार वाजता घडला. एटीएम तोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना इंटरनेट जोडणीमुळे लक्षात आले. त्याबाबत मुंबईहून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला व हडपसर पोलीस ठाण्याला या प्रकाराची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यावर हडपसर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आरोपी महातो एटीएम मशीन फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याला या पथकाने रंगेहाथ अटक केली.