हडपसर, पुणे – विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये राज्य क्रीडा दिनानिमित्त शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव उदघाटन सोहळा संपन्न झाला. एबल अनिल मोरे ( प्रोजेक्ट डायरेक्टर – होप फौंडेशन, पुणे), ॲड.तात्यासाहेब शेवाळे ( सामाजिक कार्यकर्ते, पुणे), माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर (अध्यक्ष- विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान,पुणे ), चंद्रकांत ससाणे सर (सचिव -विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान, पुणे ), दत्तोबा जांभूळकर (सरपंच -वानवडी गाव देवस्थान ट्रस्ट, पुणे ), कविताताई शिवरकर ( माजी नगरसेविका, पुणे म.न.पा.), विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले सर यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे व क्रीडांगणाचे पूजन करण्यात आले. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सन्मान करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात एबल अनिल मोरे यांनी विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत करा व आपल्या आई वडिलांचा आदर करा, त्यांची काळजी घ्या, त्यांची देखभाल करा असा बहुमोल सल्ला विद्यार्थ्यांना दिला. आयुष्यामध्ये काहीतरी चांगले करण्यासाठी कष्टाला पर्याय नाही, असे सांगून विद्यार्थ्यांनी खूप कष्ट करा व आयुष्यात काहीतरी चांगले करून दाखवा, असे सांगितले.
ॲड. तात्यासाहेब शेवाळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शालेय स्पर्धा ह्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाच्या असल्याचे सांगून शारीरिक व मानसिक विकास साधण्यासाठी अभ्यासाबरोबरच खेळही महत्त्वाचा आहे, खेळामुळेच अभ्यासात व खेळात एकाग्रता वाढते, असे सांगितले. तसेच उत्तम आरोग्य असेल तर तुम्ही चांगले आयुष्य जगू शकता,त्यामुळे निरोगी रहा, असे सांगितले. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर हे दारिद्रय रेषेखालील व गरीब मुलांकरिता मोफत शिक्षण व शालेय साहित्य देण्याचे अनमोल असे कार्य करीत असल्याचे सांगून त्यांच्या या कार्याचे कौतुक केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर यांनी शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेनिमित्त सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळाची प्रेरणा मिळावी म्हणून ऑलंपिक कुस्ती खेळाडू खाशाबा जाधव यांची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे विद्यार्थ्यांना सांगितले.विद्यार्थ्यांनी खूप शिका आणि मोठे व्हा.त्याचबरोबर आपले आई वडील, शिक्षक, शाळा, संस्था, गाव यांनी आपल्यासाठी केलेल्या सहकार्याची व मदतीची जाणीव ठेवा असे सांगितले. हीच जाणीव लक्षात ठेवून प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक व माजी विद्यार्थी श्रीकांत बदाले याने २६ जानेवारी रोजी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना जेवण देण्यायासाठीचा मानस व्यक्त केल्याबद्दल त्याचे कौतुक केले.
मा.नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यातीलच शालेय क्रीडा समारंभ हा ही एक भाग असल्याचे सांगितले. सुदृढ आरोग्य हा खरा दागिना आहे. त्यासाठी व्यायाम करा, मोबाईल पासून दूर रहा व मैदानावर खेळा असे सांगितले. “कर भला, तो हो भला” या उक्तीप्रमाणे शिवरकर साहेब हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात, त्यांच्या या कार्याला नेहमीच शाळेचे हितचिंतक व अनेक सहकारी हे आपल्या विद्यालायास शैक्षणिक मदत हे करत असतात, असे सांगितले. एबल मोरे साहेब यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी वारंवार केलेल्या शालेय सहकार्याबाबत आभार व्यक्त केले.
याप्रसंगी माजी नगरसेविका कविताताई शिवरकर यांनी नवीन वर्षाच्या व क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.क्रीडा हा आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाचा भाग असल्याचे सांगून आपले मन-तन यामुळे प्रफुल्लीत होते, असे सांगितले.खेळामुळे बुद्धीला चालना मिळते, आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक विचारसरणी होत असल्याचे सांगितले.तसेच रोहन दामले यांच्या यशामध्ये त्यांचे आई वडील यांच्या कर्तुत्वाची व कै.धनंजय दामले सर यांच्या आठवणीना उजाळा दिला.
याप्रसंगी श्रीमती प्रतिभा हरीभक्त यांच्याकडून त्यांच्या आईच्या सहस्त्र सोहळ्यानिमित्त संविधानाच्या ५० प्रतीचे वाटप केले.त्यातील एक प्रत आपल्या विद्यालायासा सप्रेम भेट देण्यात आली.याप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीटाचा खाऊ वाटप करण्यात आला.
याप्रसंगी सोनाली परदेशी, सतिश गवळी, सोपानराव गवळी, सिद्धार्थ परदेशी, अनंतराव शिवरकर, दीपक शिंदे,किशोर शिंदे, पुंडलिक गवळी, ॲड.विजय राऊत, दिलीप शिवरकर, अशोक शिवरकर, जयराम जांभूळकर, लव्हे सर, दत्ता डूरे, उदय लोणकर, सुनील खांदवे, प्रवीण जाधव, रमेश काकडे, विजय कोद्रे, यशवंत झगडे, यशवंत होळकर, मनोज खंडेलवाल, सोमनाथ केदारी,सूर्यकांत देडगे, सुरेश तेलंग, वानवडी ग्रामस्थ, पालक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लहू वाघुले सर यांनी केले.सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका श्रद्धा ससाणे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन सुनील गायकवाड ( मा. चेअरमन – सन्मित्र सह. बँक )यांनी केले.