पुणे : शिवसेना (ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक एका आठवड्यातच नरमले आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेत या नगरसेवकांनी खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असून कोर्टाच्या निकालानंतर हे सिद्ध होईल, असे वक्तव्य केले होते.
यावरून शिवसेना ( शिंदे) पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडाला आवर घाला, अशा शब्दात भाजपच्या नेत्यांना सुनावत नाराजी व्यक्त केली होती. विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हट या नगरसेवकांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे.
या प्रकारानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षातून भाजपमध्ये आलेल्या माजी नगरसेवकांना फटकारले असून पुढील काळात अशी वक्तव्य करू नका, अशी ताकीद दिली आहे. भाजपच्या नेत्यांनी काढलेल्या खरडपट्टीनंतर महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपमध्ये प्रवेश केलेले ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिलेदार चांगलेच नरमले आहेत. खरी शिवसेना ही ठाकरे यांचीच असल्याचे ठामपणे सांगणाऱ्या या माजी नगरसेवकांनी आपली भूमिका बदलली आहे.
माजी नगरसेवक विशाल धनावडे म्हणाले, “खरी शिवसेना कोणती याबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर अनवधानाने उद्धव ठाकरे असे उत्तर दिले गेले. त्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. महायुतीतील आम्ही सर्वच पक्ष एकदिलाने काम करत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबद्दल आमच्या सर्वांच्या मनात नितांत प्रेम, आदर आणि विश्वास आहे.
शिवसेना ( शिंदे) पक्षाचे शहरप्रमुख नाना भानगिरे म्हणाले, धनवडे यांनी केलेल्या खुलाशानंतर आमच्या मनात त्यांच्याबद्दल किंवा भाजपमध्ये प्रवेश केलेल्या इतर नगरसेवकांबद्दल कोणताही आक्षेप नाही. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वडिलकीच्या नात्याने आमची एकत्र भेट घडवून आणली, त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. पुणे शहराच्या विकासासाठी या पुढील काळात आम्ही महायुती म्हणून एकदिलाने काम केले जाईल.
काय म्हणाले माजी नगरसेवक धनवडे आणि ओसवाल…
‘व्यक्तिकेंद्रित पक्ष की राष्ट्रकेंद्रित पक्ष यामध्ये आम्ही भाजपची निवड केली. खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असून, न्यायालयाच्या निकालानंतर हे स्पष्ट होईल.’ असे वक्तव्य या दोन्ही माजी नगरसेवकांनी हिंदुत्वासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय का निवडला नाही? या प्रश्नावर उत्तर देताना केले होते. भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी आमच्या पूर्वीच्या पक्षावर कधीच टीका करणार नाही. त्यांची भूमिका पटली नाही, त्यामुळे पक्षबदल केला, असे या नगरसेवकांनी स्पष्ट केले होते.