पुणे

दिव्यांग, स्वमग्न मुलांच्या सादरीकरणाने रंगली ‌‘नवप्रेरणा‌’ सांगीतिक मैफल नववर्ष, संक्रांतीनिमित्त विदुषी सानिया पाटणकर यांचे आयोजन, सुप्रसिद्ध गायिका जयश्री रानडे यांचा संगीत मातोश्री पुरस्काराने सन्मान

पुणे : नववर्ष आणि संक्रांतीचे निमित्त साधून प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे ‌‘नवप्रेरणा‌’ या अनोख्या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दिव्यांग, अंध, स्वमग्न कलाकारांनी गायन-वादनातून रसिकांची मने जिंकली. मैफलीची सांगता विदुषी सानिया पाटणकर यांच्या शास्त्रीय गायनाने झाली.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‌‘नवप्रेरणा‌’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. शारंगधर नातू, ॲड. केशव मगर, उज्ज्वल केसकर, बालकल्याण संस्थेच्या संचालिका अपर्णा पानसे, डॉ. सुचित्रा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मैफलीची सुरुवात गौरी गंगाजळीवाले यांनी सादर केलेल्या राग पुरियाधनश्रीने झाली. त्यांनी विलंबित एकताल आणि द्रुत तीनताल सादर केला. त्यानंतर तिलंग रागातील दीपचंदिमध्ये ठुमरी सादर केली.

भूषण तोष्णीवाल यांनी कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध अनवट असा अमृतवर्षिणी राग आणि ‌‘मृगनयना रसिक मोहिनी‌’ हे नाट्यगीत प्रभावीपणे सादर केले.
दत्तात्रय भावे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या बालकल्याण संस्थेतील दिव्यांगांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. मुलांनी शास्त्रीय संगीतातील अतिशय अवघड रचना एकत्रितरित्या सादर केल्या. ‌‘तेजो निधी लोहगोल‌’ या नाट्यगीतानंतर राग जोग आणि तराणा तयारीने सादर केला.
कार्यक्रमाची सांगता करताना विदुषी सानिया पाटणकर यांनी जयपूर घराण्याचा जोड राग बसंतीकेदार सादर केला. विलंबित बंदिश ‌‘अतर सुगंध‌’, त्याला जोडून पंडिता मोगुबाई कुर्डीकर यांची ‌‘खेलन आई नवेली नार‌’ ही बंदिश सादर केली. पाटणकर यांनी मैफलीची सांगता राग बसंतमध्ये अतिद्रुत लयीतील सरगम गीताने केली. कलाकारांना विनायक गुरव (तबला), माधव लिमये (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली.

सुप्रसिद्ध गायिका जयश्री रानडे यांचा सन्मान

याच कार्यक्रमात महाबळेश्वरकर परिवारातर्फे सुप्रसिद्ध गायिका जयश्री रानडे यांना संगीत मातोश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नितीन महाबळेश्वरकर, अनुश्री कुलकर्णी, अनुराधा गोसावी यांच्या वतीने त्यांच्या आई सुजाता दिगंबर महाबळेश्वरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. सुचित्रा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.