पुणे : काळाच्या ओघामध्ये माध्यमांचे स्वरूप जरी बदलत गेले असले तरी त्यांची भूमिका ही कायम समाजाप्रती सकारात्मकतेची असणे गरजेचे आहे. परंतु सध्या मात्र माध्यमांचा उपयोग राजकारण करण्यासाठी केला जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरुणांमध्ये राजकारणाची सकारात्मक बाजू ठेवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून सकारात्मक राजकारण घडवून आणण्यासाठी सशक्त माध्यमांची समाजामध्ये गरज आहे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजित आठव्या युवा संसद मध्ये माध्यमे राजकारण घडवतात? या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये मान्यवर बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आदर्श युवा पुरस्कार नुकतेच आयएएस झालेले ओंकार गुंडगे यांना प्रदान करण्यात आला.
कमलेश सुतार म्हणाले, माध्यमे हे पुरस्कारांपेक्षा नेहमी तिरस्कारचे धनी होतात. राजकारण हा शब्द बदनाम झाला आहे. राजकारण म्हणजे वाईट असते ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आज मोबाईलच्या रूपामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये साधन आले आहेत. त्या साधनाचा उपयोग करून प्रत्येक जण पत्रकार होऊ शकतो. मात्र त्यासाठी समाजाप्रती आस्था असणे गरजेचे आहे.
ओंकार गुंडगे म्हणाले, निर्भयता, सामर्थ्य, औदार्य या गुणांमुळे तरुण आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात. राजकारणामध्ये या गुणांच्या तरुणांची आज समाजाला गरज आहे. तुमचा एक निर्णय समाजाचा चेहरा मोहरा बदलू शकतो. त्यामुळे राजकारणामध्ये सुशिक्षित तरुणांची गरज आहे आणि अशा प्रकारचे सुशिक्षित तरुण घडवण्याचे काम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट युवा संसदेच्या माध्यमातून करत आहे.