पुणे

नवमूत्रमार्ग, कृत्रिम स्नायू प्रस्थापित करून तरुणीचे जीवन आनंदी व पूर्ववत

* पुण्यातील युरोकूल-कुलकर्णी युरोसर्जरी इन्स्टिट्यूट व उमरजी हॉस्पिटलमध्ये देशातील पहिलीच क्लिष्ट शस्त्रक्रिया व प्रसूती यशस्वी
* जागतिक कर्करोग दिनी डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. चिन्मय उमरजी यांची माहिती;  कर्करोगाबत जागरूक राहण्याचे आवाहन

पुणे: “ऑटो इम्यून ट्युमरमुळे लघवीचा मार्ग गमवावा लागलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणीला नवमूत्रमार्ग, कृत्रिम स्नायू प्रस्थापित करून तिचे जीवन आनंदी व पूर्ववत करण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले आहे. कृत्रिम मूत्रमार्ग बसवल्यानंतर तिची गळणारी लघवी थांबलीच; पण तिचे लग्न होऊन ती गरोदर राहिली व नुकताच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या तरुणीचे ‘स्त्रीत्व’ पूर्ण झाल्याने तिच्यासह पती व आईच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले,” अशी माहिती युरोकूल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट डॉ. संजय कुलकर्णी यांनी दिली.

बाणेर येथील ‘युरोकूल’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी जगातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, प्रसूतीरोग तज्ज्ञ व उमरजी हॉस्पिटलचे चिन्मय उमरजी, युरोलॉजिस्ट डॉ. पंकज जोशी, डॉ. अमित होसमनी, डॉ. श्रेयस भद्ननवार, कर्करोगतज्ज्ञ डॉ. उदय चंदनखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय चौधरी, बाणेर-बालेवाडी मेडिको असोसिएशनचे संस्थापक डॉ. राजेश देशपांडे उपस्थित होते.

डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, “मुंबईची अंजली ही तरुणी २०२२ मध्ये युरोकूलमध्ये आली. तिची लघवीची जागा आणि योनी मार्ग यादरम्यान गाठ तयार झाली होती. तिचा मूत्रमार्ग व त्यावरील मांस विरघळून गेल्याने लघवीवर नियंत्रण नव्हते. सतत लघवी गळत असल्याने दिवसात तिला किमान १०-१२ डायपर वापरावे लागत होते. अँटिबायोटिक व इम्युनोथेरपी दिल्याने तिचा लघवी मार्ग निकामी झाला होता. तिचे भविष्यातील जीवन अंधकारमय झाले होते. मात्र, तिला आशेचा किरण दाखवत आम्ही तिच्या दोन शस्त्रक्रिया केल्या. तपासणीअंती तिचा लघवी मार्ग बंद झाल्याचे आढळले. त्यानंतर एप्रिल २०२२ पहिली शस्त्रक्रिया केली. योनीभागातील कातडी काढून त्यापासून मूत्रमार्ग तयार केला. त्यामुळे लघवी मार्गातून तिला लघवी होऊ लागली. परंतु लघवीवर तिचे नियंत्रण नव्हते. सहा महिन्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया केली आणि लघवी मार्ग व योनीमार्गाच्या मधोमध ‘आर्टिफिशियल युरीनरी स्प्रिंक्टर’ हे अत्याधुनिक उपकरण बसवले. त्यानंतर तिची लघवी सुरळीत झाली. या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तिचे लग्न झाले. ती गरोदर राहिली आणि चार दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.”

डॉ. चिन्मय उमरजी म्हणाले, “अंजली गरोदर राहिल्यानंतर डॉ. कुलकर्णी व डॉ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उमरजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. ‘आर्टिफिशियल युरिनरी स्प्रिंक्टर’ बसवल्याने प्रसूती जिकिरीची होती. त्यामुळे सुरवातीपासूनच आम्ही विशेष खबरदारी घेतली. सोनोग्राफी व प्रगत मशीनद्वारे बाळाची व आईची तपासणी करून सिझरियन पद्धतीने ही प्रसूती करण्यात आली. प्रसूती करताना स्प्रिंक्टरला धक्का लागणार नाही व तिला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. आता बाळाची आई सुखरूप असून, जवळपास तीन किलो वजनाचे बाळ सुदृढ अवस्थेत आहे.अंजलीसह त्यांचे पती व आई यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून कृतार्थ झालो आहोत.”
 
डॉ. पंकज जोशी यांनी ‘आर्टिफिशियल युरिनरी स्प्रिंक्टर’ शस्त्रक्रियेची माहिती दिली. या शस्त्रक्रियेमुळे अंजलीला नवे आयुष्य मिळाले आहे. तिचे आयुष्य पूर्ववत झाले असून, लग्न व मातृत्व या दोन्हीही सहजपणे झाल्याने दोन वर्षांपूर्वी निराश अवस्थेत असलेल्या अंजली व तिच्या आईंचा आनंद गगनात मावत नाही. प्रसूती झाल्यानंतर व आपल्या नातवाला हातात घेतल्यानंतर तिच्या आईंनी कडाडून मारलेली मिठी आणि ढाळलेले आनंदाश्रू आजवर केलेल्या कामाची पावती आहे.”

डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी स्तनाचा कर्करोगाविषयी प्रतिबंधात्मक काळजी घेण्याबाबत सांगितले. महिलांनी चाळिशीनंतर मॅमोग्राफी करावी. तसेच स्तनांची स्वतःच्या हाताने नियमित तपासणी करावी. गाठ लागली, तर लागलीच डॉक्टरांशी भेटून घ्यावे, असे त्यांनी नमूद केले.