पुणे

मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आंतर भारती बालग्राम व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

लोणावळा, ८ – इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी (ISC) तर्फे आंतर भारती बालग्राम आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा ८ फेब्रुवारी रोजी लोणावळ्यात आयोजित करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत सुमारे २०० माजी विद्यार्थ्यांसंमवेत सोहळा संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास आमदार श्री. सुनील शंकरराव शेळके, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, इंडिया स्पॉन्सरशिप कमिटीचे अध्यक्ष श्री. शैलेश दालमिया, विधायक भारतीचे संचालक श्री. संतोष शिंदे उपस्थित राहणार आहेत.

ISC च्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय विश्वस्त, डॉ. झुली नाखुदा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने आणि बालकल्याणासाठीच्या अथक समर्पणाने गेल्या पाच दशकांमध्ये ५०० हून अधिक मुलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आहे. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे.

हा स्नेहमेळावा ISC च्या प्रभावी प्रवासाच्या ५५ वर्षांचा टप्पा साजरा करतो आणि सरकारी संस्था आणि स्वयंसेवी संघटनांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो. या निमित्ताने ई-बालसंगोपन या ऑनलाइन समुदायाचे (Blog) आयोजन करण्याचा येणार आहे. जो २१ व्या शतकातील मुलांच्या बदलत्या गरजांकडे लक्ष देण्यासाठी सर्वसमावेशक सामाजिक सहभागाला प्रेरित करेल.

“हा स्नेहमेळावा ही बालसंगोपनासाठीच्या संकल्पनांची देवाण-घेवाण आणि नवीन दृष्टिकोन विकसित करण्याची एक अद्वितीय संधी आहे, जी आपल्या मुलांसाठी उज्ज्वल भविष्याचा मार्ग मोकळा करेल,” असे ISC च्या कार्यकारी संचालिका मेधा ओक यांनी सांगितले.

ISC सर्व माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि भागधारकांना आंतर भारती बालग्राम, लोणावळा येथे या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मेधा ओक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 98206 11500 या क्रमांकावर संपर्क साधावा.