पुणे

शिवजयंती निमित्त २० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागाने पदयात्रेचे आयोजन

पुणे, दि. १६: राष्ट्रभावना, सामाजिक सलोखा, युवांच्या संकल्पना जाणून घेणे, कला, संस्कृती व परंपरा जतन करणे, स्वच्छता, पर्यावरण याबाबत जागृकता, राष्ट्र निर्माणात मोलाचे योगदान देणा-या व्यक्तिमत्वाच्या कार्याचे आदर्श युवा पिढी पर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने शिवजयंती दिनी ” जय शिवाजी, जय भारत” पदयात्रेचे सकाळी ९.३० वा. ते १२.३० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक वारसा जतन करणे यासाठी केंद्र शासनाच्या युवा कल्याण व खेळ मंत्रालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्र व राज्याच्या शाश्वत विकासात युवांचे मोलाचे योगदान आहे. युवांमध्ये नेतृत्व गुण, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक सेवा भाव, शासकीय उपक्रमांबाबत माहिती व सहयोग यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यामुळे या पदयात्रेत युवा व क्रीडा पुरस्कारार्थी तसेच शहरातील सुमारे १५००० ते २०००० विद्यार्थी व युवा सहभागी होणार आहेत. या पदयात्रेला राज्याचे मुख्यमंत्री, नागरी विमान वाहतूक आणि सहकार केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण व अन्य मंत्री सहभागी होणार आहेत.

पदयात्रेचा सकाळी ९.३० वाजता सी.ओ.ई.पी तंत्रनिकेतेन विद्यापीठ, शिवाजीनगर पुणे येथील क्रीडांगणावरुन प्रारंभ करण्यात येणार आहे. पदयात्रेचा मार्ग सी.ओ.ई.पी. होस्टेल गाऊंड, शिवाजीनगर ते फर्ग्युसन महाविद्यालय असा राहील. सी.ओ.ई.पी. होस्टेल ग्राऊंड, डावीकडे वळून स.गो. बर्वे चौक, डावीकडे वळून एआयएसएसपीएमएस कॉलेज, छ. शिवाजी महाराज पुतळा अभिवादन (हॉल्ट नं. १) उजवीकडे वळून कोर्टासमोरील गेटमधून उजवीकडे वळून छ. शिवाजी महाराज पुतळा चौक, उजवीकडे वळून स.गो. बर्वे चौक, डावीकडे वळून जंगली महाराज रोडने झाशीचीराणी चौक (हॉल्ट नं. २) छ. संभाजी महाराज पुतळा, खंडोजी बाबा चौक यु टर्न करून गुडलक चौक, फर्ग्युसन कॉलेज गेट डावीकडे वळून फर्ग्युसन कॉलेज असा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाचे अधिकारी यांचेमार्फत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. पदयात्रेमध्ये शहरातील युवा, युवतींनी, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.