पुणे

“केशवनगर मुंढवा येथे शाळेसाठी ॲमिनिटी स्पेसची जागा द्यावी, अन्यथा आंदोलन करणार, प्रसाद कोद्रे यांची पालिका शिक्षण विभागाकडे मागणी..!

पुणे (प्रतिनिधी)
महापालिकेच्या नव्याने समाविष्ट गावातील कोद्रे वस्ती, लोणकर पडळ, भोई वस्ती येथे शाळा सुरू आहे पहिली ते चौथी विद्यार्थ्यांचा पट 115 असून या शाळेत आर्थिक मागास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही जागा शाळेच्या विद्यार्थ्यांना अपुरी असून महापालिकेच्या ॲमिनिटी स्पेस मधून शाळेसाठी जागा देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष प्रसाद कोद्रे यांनी शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे, आर्थिक दृष्ट्या गोरगरिबांची मुले या शाळेत शिक्षण घेत असताना शाळेची अवस्था दयनीय आहे, शाळेत शौचालयाची व्यवस्था नाही, शाळेचे बांधकाम पत्र्याचे असल्यामुळे पावसाळ्यात गळती होऊन पाणी साचते, विद्यार्थ्यांना खेळायला मैदान नाही, शाळेला रंगरंगोटी करण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाल्याने शाळेच्या आजूबाजूला घरे झाली आहेत त्यामुळे शाळेला जागा कमी पडत आहे.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून या शाळेसाठी जवळील ॲमिनिटी स्पेस मधील जागा उपलब्ध करून द्यावी परिसरात अनेक ॲमिनिटी स्पेस शिल्लक आहेत विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेता ॲमिनिटी स्पेस मध्ये ही शाळा सुरू करावी, विकास आराखडा मंजूर झाल्यावर ही शाळा कायमस्वरूपी तेथे स्थलांतरित करावी शैक्षणिक वर्ष 2025 – 26 सालासाठी शाळेसाठी ॲमिनिटी स्पेस मंजूर करून विद्यार्थ्यांना होणारा त्रास थांबवा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही प्रसाद कोद्रे यांनी दिला आहे.