पुणे

पुण्यात अवतरली शिवशाही : शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे आयोजन : सलग १४ व्या वर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ… एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ… महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना… ५१ रणशिगांची ललकारी… नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथकाचा रणगजर… सनई-चौघडयांचे मंगलमय सूर… हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. सोहळ्याचे उद्घाटन शिवरायांचे वंशज श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीआण्णा मोहोळ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त विशेष शाखा मिलींद मोहिते, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, हेमंत रासने तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी पोलीस उपायुक्त संदीप गिल्ल, दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने जेष्ठ विधीज्ञ प्रताप परदेशी उपस्थित होते. तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे यंदा १३ वे वर्ष आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. शिवाजी महाराजांचा ऐक्याचा विचार आजही पाहायला मिळत आहे. पुण्यात शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत आहेत. यानिमित्ताने शिवरायांसोबत असलेले सरदार, मावळे यांचे स्मरण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता, त्यावेळी प्रत्येक पायरीवर त्यांना स्वराज्यातील सरदार व मावळ्यांची आठवण झाली. स्वराज्य स्थापनेमध्ये शिवरायांसोबत असलेले सरदार व मावळे यांचे स्मरण या सोहळ्याच्या निमित्ताने केले जात आहे.

भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युध्दकला सादर केली. नादब्रह्म ढोल ताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.

सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, मंगेश शिळीमकर, गोपी पवार, समीर जाधवराव, प्रवीणभैय्या गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.

शिवरायांच्या पुतळ्यावर हेलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी

ईशान अमित गायकवाड यांनी सलग १४ व्या वर्षी शिवजयंती १९ फेब्रुवारीला शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर हैलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी केली.

ईशान गायकवाड म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकावर शिवरायांचे संस्कार हे लहानपणीच झाले असतात. शिवाजी महाराज म्हणले की आपसुकच आपण जय म्हणतो. माझे हे परमभाग्य आहे की शिवरायांच्या विश्वातील पहिल्या स्मारकावर मी सलग १४ वर्षे पुष्पवृष्टी करतो आहे. १९ फेब्रुवारीला विश्ववंदनीय शिवरायांचे आणि आमच्या गायकवाड स्वराज्यपरिवाराचे हे एक भावनिक नात निर्माण झाल आहे. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि पुणे पोलीस यांचे विशेष आभार ईशानने यावेळी मानले.

 

या हेलीकॅप्टर पुष्पवृष्टीचे संकल्पक अमित गायकवाड म्हणाले, आपण पुणेकर भाग्यवान आहोत. करवीर संस्थानाचे राजर्षी शाहू छत्रपती आणि त्यांचे पुत्र राजाराम छत्रपती यांनी शिवरायांचे हे स्मारक पुणे येथे निर्माण केले. शिवरायांचा एकसंध ओतीव काम केलेला हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य पुतळा आहे. १६ जून १९२८ साली ह्या स्मारकाचे अनावरण झाले होत. पुतळ्याचे वजन तब्बल ८००० किलो आहे. शिवरायांच्या चित्तथरारक इतिहासा सारखाचा ह्या स्मारक निर्मितीचा इतिहास चित्तथरारक आहे.