पुणे

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे  जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने
सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

शिवजन्मोत्सवाच्यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुरु होते, शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा,जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो.

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकास कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील १२ गड किल्ले  नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत
येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरीता येतील, अशा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुगल साम्राज्यात विविध राजे, राजवाडे मांडलिकत्व पत्कारत असताना मराठी मुलखात अनाचार, अत्याचार सुरु होते. माॅं जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना याविरुद्ध प्रतिकार करुन स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी दिली. छत्रपती महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करुन मावळ्यांची फौज तयार केली; यामाध्यमातून देव, देश आणि धर्माची लढाई सुरु करुन स्वराज्य स्थापनेतून खऱ्याअर्थाने भारताचा आत्मभिमान जागृत केला. आजच्या १४० कोटी लोकसंख्येच्या आत्मभिमानी भारताच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा असून ते आमचे आराध्य दैवत आहेत.

येत्या ५ वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ४०० वा शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत. किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर येथील मातीतून स्वराज्याची स्फूर्ती, तेज मिळते. यातून प्रेरणा घेऊन राज्याची सेवा करण्याकरीता आम्ही येथे येतो. राज्यशासनामार्फत शिवनेरी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू असे श्री. फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘सर्वसमावेशक कारभार’ डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे;  लोकल्याणकारी राज्य निर्मितीकरीता यापुढेही प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असून त्यांनी यामध्ये प्राण फुंकले आहे. हे गड किल्ले अभियांत्रिकी, स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे.  याठिकाणी आल्यावर आपल्याला एक वेगळ्याप्रकारची ऊर्जा, प्रेरणा मिळते. म्हणून या गड किल्ल्याची देश विदेशातही लोकप्रियता आहे. त्यामुळे गड किल्ले, जुन्या मंदिरांचे जतन आणि संवर्धनाची कामे करण्यात येत आहे.गड किल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन एक सर्किट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे श्री. शिंदे म्हणाले.

शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना पर्यावरणाचे रक्षण केले. छत्रपती शिवरायांची आरमारी ताकत नौदलाकरीता प्रेरणादायी आहे. नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

भारत पाकिस्तान सीमेवर कुपवाडा, आग्र्याला देखील दिवाण-ए- आम तसेच विविध देशातही शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरा करण्यात येत आहे. महाराजाची वाघनखे ब्रिटनहून भारतात आणण्यात आली असून ती बघण्यासाठी नागरिक, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.असे ते म्हणाले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, किल्ले खऱ्याअर्थाने त्यांची दौलत आहे, ते आपले शक्तीस्थान, स्फूर्तीस्थान असून त्यांचे जतन, संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यशासनाच्यावतीने
किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकासकामे करीत आहेत, किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रसंग, त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित, जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेऊन दूरदृष्टीने निर्णय घेतलेला होता. सामाजिक एकोपा, न्याय, सुशासन आणि लोकल्याणाची शिकवण दिली. त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया, महाराष्ट्राला आणखी महान राष्ट्र करण्यासाठी एकजुटीने, एकदिलाने काम करुया, शिवरायांची शिकवण आणि त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, हीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेल, असे श्री. पवार म्हणाले.

आमदार श्री. सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले

प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळच्या लहान विद्यार्थ्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व माॅं जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉ. अमोल डुंबरे, जालिंदर कोरडे आणि राजाभाऊ पायमोडे यांना शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी  गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.