पुणे – आज महाराष्ट्रातील अनेक लोक हे विदेशात राहत आहेत. अशा नागरिकांना भारतीय नागरिकांसाठी बरेच काही करण्याची इच्छा असते, त्यामुळे अशा एनआरआय लोकांना एकत्रित करून त्यांच्याकडून एकीकडे आपल्या देशात विविध विकासकामे करणे तसेच या एनआरआय मध्ये काँग्रेसची विचारधारा वाढवण्याचे काम केले जात आहे, या माध्यमातून २०२९ साली देशात काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न काँग्रेस एनआरआय सेलच्या वतीने प्रयत्न केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनिवासी भारतीय विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्ष विद्या कदम यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एनआरआय सेलच्या वतीने पुण्यात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार परिषदेत विद्या कदम बोलत होत्या. या पत्रकार परिषधेला कार्याध्यक्ष डाॅ. मॅन्युएल डिसूझा, उपाध्यक्ष आॅगस्टीन निक्सन, उपाध्यक्ष तथा प्रवक्ते धनंजय बुद्धिवंत, जॅकलिन फॉरेस्टर, महिला आघाडी अध्यक्षा अलिशा शेख आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना विद्या कदम म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाचे वेगवेगळ्या स्तरावर पक्ष मजबुतीचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेस महाराष्ट्रातील जे एनआरआय विविध देशांमध्ये वास्तव्या आहेत, त्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचे काम आम्ही करीत आहोत. या माध्यमातून एकीकडे आम्ही या एनआरआयच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, तर दुसरीकडे त्यांच्या माध्यमातून भारतात शिक्षण, रोजगारवाढ या दृष्टीने काम करू.
या वेळी बोलताना उपाध्यक्ष तथा प्रवक्ते धनंजय बुद्धिवंत म्हणाले की, आज भारतात शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे प्रश्न फार गंभीर बनले आहेत. काँग्रेस एनआरआय सेल विदेशात असलेल्या अनिवासी भारतीयांना सोबत घेऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे. सुरवातीला आम्ही एक हजार गावात हजार रोजगार उत्पन्न करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अनिवासी भारतीयांच्या साथीने आम्ही हे काम पुढे नेऊ. गावागावात रोजगार निर्माण करणे किंवा स्वयंरोजगारासाठी युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि पतपुरवठ्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. या माध्यमातून काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
डाॅ. मॅन्युएल डिसोझा यांनी मोदी सरकार वर टीकास्त्र सोडले. त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या काळात देशात अनेक समस्या बोकाळल्या असून, त्या द्वारे देशात आज गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थिती संदर्भात आगामी काळात प्रदेश काँग्रेस अनिवासी भारतीय सेलच्या वतीने जनजागृती केली जाईल.