छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : माणसाची जडण-घडण, भाषा, संस्कृती भिन्न असली तरी माणूस आतून एकच असतो. प्रेम कधीही, कुठेही होऊ शकते, त्याला कशाचाच अडसर नसतो. समान भारतीय धागा जुळल्यानंतर प्रांत आणि भाषेचा अडथळा ओलांडून संसार आणि परिवार आनंदी होतो. भाषेचा सातत्याने व सतर्कतेने वापर झाल्यास ती आपोआप आत्मसाद होते आणि तिचे संस्कार रुजत जातात, असा सूर ‘मनमोकळा संवाद-मराठीचा अमराठी संसार’ या परिसंवादात उमटला.
अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे सरहद, पुणे-दिल्ली आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात या आगळ्या-वेगळ्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण सभागृहातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंचावर या दिलखुलास मनमोकळ्या गप्पा आज (दि. 22) रंगल्या.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे-डॉ. साधना शंकर, राजदीप सरदेसाई-सागरिका घोष, रेखा रायकर-मनोजकुमार, डॉ. मंजिरी वैद्य-प्रसन्ना अय्यर यांचा सहभाग होता. अस्मिता पांडे आणि बाळ कुलकर्णी यांनी त्यांना हलके-फुलके प्रश्न विचारून बोलते केले. आमदार डॉ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजदीप सरदेसाई यांनी आपल्या मिश्किल शैलीत पत्नी सागरीका घोष यांच्याबरोबर झालेल्या पहिल्या भेटीची आठवण सांगत ओळख करून दिली. माझ्या लिखाणाचे पहिले समीक्षण सागरिकाच करते, याचा कौतुकाने उल्लेख केला. पत्नीला क्रिकेटमधले फारसे ज्ञान नसले तरी माझ्या सासुबाई मात्र क्रिकटेच्या चाहत्या असल्याने त्यांच्याशी माझी चांगली गट्टी जमली, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. सागरिका घोष यांनी राजदीप यांच्या कामाचे कौतुक करून सांगून आमच्या घरात बंगाल आणि महाराष्ट्र यांचे द्वंद सुरूच असते, असे सांगितले. राजदीप सरदेसाई यांच्यासारखा पत्रकार पूर्ण भारतात सापडणार नाही हे नुसती पत्नीच नव्हे तर पत्रकार म्हणून माझे ठाम मत आहे. बातमी ही जणू माझी सवतच आहे. नवरा-बायकोच्या सहजीवनामध्ये बायकोने कधीकधी ऐकूच आले नाही, अशी भूमिका घेतल्यास संसार आनंदी होतो या सासूबाईंच्या सल्ल्याने मी संसार यशाच्या मार्गावर नेला, असेही त्या म्हणाल्या.
साधना उत्तम कलाकार आणि लेखिका आहे. माझी ओढ अजूनही गावच्या मातीत रुजलेली आहेत तर साधना उच्च शिक्षण घेतलेल्या शहरी वातावरणात वाढलेली आहे तरीही ती आवडीने खेड्यात रमते, असे सांगून डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, माझ्या फक्त मराठी बोलणाऱ्या आईशी तिचे अनुबंध जुळले होते. नोकरीच्या निमित्ताने देश-परदेशात वास्तव्य असल्याने आमची मुले बहुभाषिक बनली आहेत. डॉ. साधना शंकर म्हणाल्या, ज्ञानेश्वर यांचा भक्कम पाठिंबा आमच्या संसाराला लाभला आहे. आमचे नाते म्हणजे माझ्या बाजूने ‘लव्ह ॲण्ड हेट’ तर त्यांच्याकडून ‘टॉलरेट’ असे असल्याचे त्यांनी मिश्किलपणे सांगितले.
महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडल्या की आपली इतर संस्कृतींशी ओळख होत जाते. पती मनोज यांचा मराठी नसूनही ‘लाथ मारेन तेथे पाणी काढेन’ हा मराठी बाणा मला विशेष भावला, असे रेखा रायकर म्हणाल्या. लहान वयातच विविध भाषांचे संवादरूप संस्कार झाल्यास बहुभाषकीयत्व आत्मसाद होते. लग्नानंतर काही प्रमाणात तडजोडी करताना पतीची भक्कम साथ लाभल्यास स्त्रीला बदल स्वीकारणे सुकर जाते. मनोजकुमार म्हणाले, रेखा ही उत्तम पत्नी, कुटुंबात रमणारी असून तिच्या हाताला उत्तम चव आहे. भाषा, संस्कृती याचा प्रत्येक व्यक्तीला अभिमान असणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे कौतुकास्पद आहे. मराठी बोलता येत नसले तरी मला मराठी चित्रपट आणि नाट्यकृती पहायला मनापासून आवडते, असेही त्यांनी विशेषत्वाने सांगितले.
डॉ. मंजिरी वैद्य म्हणाल्या, माझे पती प्रसन्ना अय्यर माझ्यातील कलाकाराचा उत्तम सांभाळ करतात. भाषेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, मुलांचे संगोपन करताना भाषाभेद न ठेवता योग्य वयात मुलांवर भाषेच उत्तम संस्कार केल्यास ते बहुभाषिक बनतात. बहुभाषिक असल्यामुळे व्यक्तीमध्ये विविध संस्कृतीचा मिलाफ होतो. मंजिरीचे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो. मी तमीळ असलो तरी माझी जडण-घडण महाराष्ट्रातच झाल्याने थोडाफार फरक वगळता आमच्यावर फारसे भिन्न संस्कार झालेले नाहीत. त्यामुळे आमचे सूर सहजतेने जुळले, असे प्रसन्ना अय्यर म्हणाले.
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, माझा विवाह मराठी आणि त्यातही पुण्यातील मुलीशी झाल्याने मला भाषा, संस्कार, रितीभाती यांच्या आंदोलनांना सामोरे जावे लगाले नाही. परंतु पतीला असलेला पत्नीचा प्रेमळ धाक मी आनंदाने सहन करतो आहे.
मान्यवरांचे स्वागत डॉ. विश्वजित कदम यांनी केले.