पुणे

स्त्रियांच्या सक्षमिकरणात महापुरुषांचे योगदान : डॉ. प्रशांत मुळे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात

“आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे आपला ठसा उमटवीत आहेत, याचे श्रेय महापुरुषांना जाते. चूल आणि मूल या चौकटीतून स्त्रीला बाहेर काढून तिच्या हातात लेखणी देऊन सक्षम करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा उद्धार केला आणि या स्त्रियांच्या हक्कांना पाठबळ देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केले आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक हक्क देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये केलेले आहे,” असे मत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमत्त कार्यक्रमाचे आजोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात स्त्रियांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम घेतले जात असतात अशा कार्यक्रमातून स्त्रियांना ऊर्जा मिळत असते असे मत डॉ. शुभांगी औटी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. महिला स्टाफच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील स्त्रियांनी विविध कलांचे सादरीकरण केले. यामध्ये राशीचक्रानुसार व्यक्ती स्वभावातील विनोदी किस्से डॉ. सविता कुलकर्णी, प्रा नाजनीन मनेर, डॉ. अश्विनी घोगरे,प्रा संगीता देवकर यांनी सांगितले. डॉ टापरे मॅडम यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलेल्या पण गणितामध्ये तज्ञ असलेल्या शकुंतला देवी यांची प्रेरणादायी सत्य कथा सांगितली डॉ. सुनीता दानाई, डॉ. शितल जगताप, प्रा. अर्चना श्रीचिपा,  डॉ. सुनीता कुंजीर, प्रा. सीमा शेरकर यांनी नोबेल पारितोषिक विजेत्या स्त्रियांच्या चरित्राचे अभिवाचन केले. तर डॉ. वंदना सोनवले, प्रा. दिपाली माळी, प्रा. पल्लवी भोसले, प्रा. ऋतुजा आबनावे, प्रा. भाग्यश्री जगदाळे, प्रा. स्नेहल शिंदे, प्रा. मनीषा जरक यांनी स्त्रीविषयक कवितांचे सादरीकरण केले. डॉ शुभांगी औटी, प्रा. अकोलकर,  प्रा. प्रियंका लांडगे यांनी गीत गायन केले. प्रा. सुनीता सायकर, प्रा. वसुधा हळदकर, प्रा. विघ्नेश्वरी, प्रा. विजयालक्ष्मी मेहकरे, प्रा. अर्चना शितोळे, प्रा. मनीषा सुरवसे, प्रा. स्नेहल दुधाने यांनी रावणरचित शिवमहात्म्य स्तोत्र या नृत्यातून योगाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती व्यावसायिक विभागाचे उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा विलास शिंदे आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर महिला उपस्थित होत्या.