पुणेः- आज मुलांची घरातील भाषा आणि शाळा-महाविद्यलयातील ज्ञानाची भाषा यात भिन्नता आढळते. इंग्रजी माध्यमात शिकणारे विद्यार्थी मराठी मातृभाषेपासून दूर जाताना दिसत आहेत. मातृभाषेचे महत्त्व घरातूनच सांगणे आवश्यक आहे. नवीन पिढीला मराठी भाषेवर मनस्वी प्रेम करायला शिकवावे लागेल. त्यांना मातृभाषेत विचार करू देणे आणि अभिव्यक्त होऊ देणे ही काळाची गरज आहे, असे मत प्रसिद्ध कवी, लेखक, वक्ते,शिक्षक आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह वि.दा. पिंगळे यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले विद्यानिकेतन संस्था पुणे, बचपन वर्ल्ड फोरम, पुणे आणि समाजसुधारक कै.सौ. शैलाताई रतन माळी स्मारक समिती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय सत्यशोधक बालकुमार मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून वि.दा. पिंगळे बोलत होते.
ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक रतन माळी, संस्थेच्या अध्यक्षा आणि या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा स्मिता वाघ, सचिव प्राचार्य रवींद्र वाघ, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते जयंत हिरे, युनिकॉर्न रिएॅलिटीच्या उपाध्यक्षा रूपाली पवार, मणिकर्णिका ग्रुपच्या अध्यक्षा मनीषा राऊत, रोटरी क्लबच्या सहाय्यक प्रांतपाल अर्चना गोजमगुंडे, स्वाती पिंगळे, कै.सौ. शैलाताई रतन माळी स्मारक समिती पुणेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेतील बालक, संमेलानाचे अध्यक्ष वि.दा. पिंगळे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना वि.दा. पिंगळे म्हणाले की, मुलांमध्ये मातृभाषेविषयी आस्था निर्माण करण्यासाठी घरातील मोठ्या व्यक्तींनी मराठीत बोलले पाहिजे. भाषेविषयी प्रमे निर्माण करण्यासाठी पुस्तक वाचन हा एक महत्वाचा मंत्र आहे. यातून नवीन पिढी मराठी भाषेतील उत्तम ग्रंथाचा शोध घेईल, तेव्हा त्यांच्या हातात अनुभवांचा मोठा खजिना पडल्याशिवाय राहणार नाही. हे साहित्य त्यांना जगण्याची प्रेरणा आणि भविष्याची ऊर्जा देईल. कारण उसवलेल्या माणसाचे आणि समाजाचे आयुष्य शिवण्याचे सामर्थ्य साहित्यात असते. पुरुषार्थ नाकारून जीवनाच्या रणांगणावरून पळून जाणाऱ्या भित्र्या समाजाला जगण्याचे, लढण्याचे बळ देण्याचे काम साहित्य करते. अज्ञान, दारिद्र्य, विषमता, अंधश्रद्धा आणि जातीयतेच्या अंधार कोठडीत बंदिवान असणाऱ्यांच्या मनात आत्मसन्मानाचे, अन्यायाविरोधात लढण्याचे शंख फुंकण्याचे काम साहित्य करते. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, उच्च-निच, ज्ञान-अज्ञानाचा भेदभाव नाहिसा करून विश्वबंधुत्वाचे स्नेहबंध निर्माण करण्याचे काम साहित्य करते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा आणि या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा स्मिता वाघ यांनी संमेलन आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक रतन माळी यांनी संस्थेच्या कार्याचा आढाव घेतला. या एकदिवसीय संमेलनाच्या उद्घटनानंतर एकपात्री सादरीकरण, कथाकथन, परिसंवाद, कवी संमेलन असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम झाले.