मुंबई/ प्रतिनीधी:[ विलास गुरव] हायटेक धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या बांधकामासाठी आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश आले असून निधीसाठी मुंबई येथे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या बस स्थानकाच्या बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याची निविदा प्रक्रियेची कार्यवाही लवकरच होणार असल्याने रखडलेल्या हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या बांधकामाचा आणखीनच मार्ग मोकळा झाला आहे.
चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाची इमारत तोडून त्या जागी नव्याने बस स्थानक बांधण्यास काही वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. यानंतर ठेकेदार व एस.टी. महामंडळ यांच्या उदासीन भूमिकेमुळे या बस स्थानकाच्या बांधकामाचा सुरुवातीपासूनच बट्ट्याबोळ उडाला. इमारतीच्या पायाचे काम परवडत नसल्याने त्यावेळच्या ठेकेदाराने बांधकाम अर्धवट सोडून दिले होते. यानंतर एस.टी. महामंडळाने त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून पुनर्बांधणीची नवीन निविदा काढली. नव्या ठेकेदाराची नियुक्ती केल्यानंतर त्याने पाया तसेच पहिल्या स्लॅबचे बांधकाम पूर्णत्वास नेले. मात्र, काही महिन्यांपासून हे बांधकाम बंद अवस्थेत आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने या प्रश्नी आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे रखडलेल्या बस स्थानकासंदर्भात वाढीव निधीची तरतूद करावी व यासाठी बैठकीची आयोजन करावे, तसे पत्रे दिले होते. या मागणीनुसार गुरुवारी मुंबई येथे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत चिपळूणमध्ये रखडलेल्या हायटेक मध्यवर्ती बस स्थानक प्रश्न चर्चा झाली यानंतर ना सरनाईक यांनी या प्रस्तानकाच्या बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या अनुषंगाने येत्या काही दिवसातच निविदा प्रक्रिया पूर्णत्वास जाऊन रखडलेल्या बस स्थानकाच्या कामाला वेग मिळणार आहे.
तसेच चिपळूण शहरातील जुन्या स्टॅन्डची दुरावस्था झाली असून या स्टॅंडचे सुशोभीकरण व्हावे तसेच परिसर विकसित व्हावा, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे केली. यावर ना. सरनाईक यांनी एस.टी. महामंडळाच्या बांधकाम प्रशासनाला आराखडा बनवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात सावर्डे बस स्थानक तोडण्यात आले आहे. या बस स्थानकाची पुनर्बांधणी व्हावी, असा देखील मुद्दा आ. शेखर निकम यांनी यावेळी उपस्थित केला. या बस स्थानकाला देखील परिवहन मंत्री ना. सरनाईक यांनी सकारात्मकता दाखवत आराखडा बनवण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी आमदार शेखर निकम यांच्यासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन, कोकण विभागीय बांधकाम कार्यकारी अभियंता सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे आदी उपस्थित होते.
चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाचे हायटेक धर्तीवर बांधकाम सुरू आहे. मात्र, निधी अभावी या बसस्थानकाचे बांधकाम रखडत असल्याने आपण हा विषय परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्यासमोर ठेवला आणि ना. सरनाईक यांनी देखील तात्काळ सकारात्मकता दर्शवत या बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत तसेच जुना एस.टी स्टँड सुशोभीकरण व सावर्डे बस स्थानकाची पुनर्बांधणी या विषयाला देखील त्यांनी सकारात्मकता दाखवली असल्याने हे दोन्ही विषय देखील मार्गी लागतील असा आपल्याला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आमदार शेखर निकम यांनी यावेळी दिली. यावरून आपण प्रवाशांच्या सोयी सुविधांना प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.