पुणे

‘सण उत्सव हे समाजात एकोपा निर्माण करण्याचे प्रभावी साधन’ हिंदू नववर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांचे प्रतिपादन

पुणे: प्रतिनिधी

समाजात साजरे केले जाणारे सण आणि उत्सव हे केवळ व्यक्तिगत अथवा कौटुंबिक आनंदापुरते मर्यादित नसून सर्व समाजाला एकत्रित आणून सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचे प्रभावी साधन आहे, असे मत हिंदू नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले.

गुढीपाडवा आणि चेटीचंड हा हिंदू नववर्षाचा सण समाजातील सर्व घटकांना आनंदाने व उत्साहाने साजरा करता यावा आणि त्याद्वारे समाजात ऐक्य निर्माण व्हावे, या उद्देशाने पायल हरेश रोहिरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निर्गुण बारीक सत्संग मंडळ (निज ठाव) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजाच्या वंचित घटकातील 300 हून अधिक गरजू मुला मुलींना ट्रस्टच्या वतीने नवीन कपडे देण्यात आले.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा विभागाचे संघचालक प्रशांत यादव, भारतीय सिंधू सभा आणि भारतीय जनता पक्ष सिंधू आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र अडवाणी, समरसता मंचाचे पुणे महानगर सहसंयोजक शरद शिंदे, आमदार सुनील कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी वयाच्या केवळ एकोणिसाव्या वर्षी बलिदान करणारे हेमू कलानी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या स्मृती जागविण्यात आल्या.

ट्रस्टचे संस्थापक निहाल रोहिरा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व उपस्थितांचे आभार मानले.