पुणे : केवळ शालेय व महाविद्यालयीन शिक्षण आणि संस्कारवर्ग एवढयावरच न थांबता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कौशल्य विकास अंतर्गत विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत १७१ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम नुकताच पार पडला. यामुळे ट्रस्ततर्फे आत्मनिर्भर भारत निर्मितीकडे एक पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.
नवीन मराठी शाळेत झालेल्या कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विजय भालेराव, शेप अॅकॅडमीचे संचालक गणेश पाटील, प्राणंद कुलकर्णी, मंगेश सूर्यवंशी, पराग वाम्बुरे, राजाभाऊ पायमोडे आदी उपस्थित होते. शेप अॅकॅडमीच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. त्यामध्ये फॅशन डिझायनिंग मध्ये २२, ब्युटी थेरपीस्ट मध्ये ३४, डिजिटल मार्केटिंग ३८, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन अँड अकाउंटिंग ७७ असे एकूण १७१ विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यामध्ये १०२ मुली आणि ६९ मुलांनी सहभाग घेतला.
महेश सूर्यवंशी म्हणाले, विद्यार्थ्यांना रोजगारापर्यंत नेतील, असे कोर्सेस शेप अॅकॅडमीसोबत सुरु आहेत. विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास व्हावा, हा यामागील उद्देश आहे. हे सर्व प्रमाणपत्र कोर्सेस असून सौंदर्य थेरपी, आयटी निगडीत प्रशिक्षणाचा समावेश आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टचे सध्या २५ हून अधिक शैक्षणिक उपक्रम सुरु आहेत. तरी युवक-युवतींनी याचा लाभ घ्यावा.
विद्यार्थी मानस गरगटे म्हणाला, ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीतून या कोर्सेसविषयी आम्हाला समजले. आज नोकरी करीत असताना या प्रशिक्षणांचा आम्हाला फायदा होत आहे. नेहमीच्या शिक्षणासोबत ही कौशल्ये देखील महत्वाची असून प्रत्येकाने असे कोर्स करणे गरजेचे असल्याचे त्याने सांगितले.