पुणे

पेट्रोल पंपावरील मॅनेजरने मालकाला घातला २ कोटींचा गंडा, लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

पुणे: पुणे सोलापूर रोड लगत असलेल्या कुंजीर वाडी येथे पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या नितीन रामचंद्र रायपूरे याने मालकाला २ कोटी ६३ लाख १५ हजार ९४२ रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याची घटना नुकतीच कुंजीर वाडी येथील एका पेट्रोल पंपावर घडली आहे. नफा होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मालकाने ऑडिट केले, त्यावेळी अपहार आणि फसवणुकीचा हा प्रकार उजेडात आला.

या प्रकरणी अक्षय बाळकृष्ण काळे (वय ३६, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मॅनेजर नितीन रामचंद्र रायपुरे (वय ५२, रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ ते मार्च २०२४ या कालावधीत अॅटोकॉर्नर पेट्रोल पंप, कुंजीरवाडी येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळे यांचा
कुंजीरवाडी येथे अॅटोकॉर्नर नावाचा पेट्रोल पंप आहे. या पंपावर आरोपी रायपुरे हा मॅनेजर म्हणून काम करतो. पूर्वी हा पंप काळे यांचे वडील पाहत होते. रायपुरे हा मागील पंधरा वर्षांपासून त्यांच्या पंपावर मॅनेजर म्हणून काम करतो. काळे यांच्या वडिलांचे आणखीन व्यवसाय असल्यामुळे तो पंप रायपुरेच्याच हातात होता. शिवाय काळे यांच्या वडिलांचा त्याच्यावर खूप विश्वास होता. दरम्यान, काळे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंपाचा कारभार त्यांच्याकडे आला.

पंपावरून इंधनाची विक्री तर होतेय, मात्र पैसे कोठे जातात हे समजत नव्हते. त्यामुळे काळे यांनी पंपाचे ऑडिटर मार्फत ऑडिट करून घेतले. त्यावेळी पंपावरून इंधन विक्री केलेले पैसे रायपुरे हा आपल्या स्वतःच्या बँक खात्यात घेत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर पोलिसांनी मॅनेजर रायपुरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास लोणी काळभोर पोलीस उपनिरीक्षक बिराजदार करत आहेत.