पुणेमहाराष्ट्र

लोणी काळभोर येथील तीन अट्टल गुन्हेगार दोन वर्षाकरीत तडीपार

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर : पूर्व हवेली व लोणी काळभोर परिसरमध्ये बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, व दहशत करणे, खुनाचा प्रयत्न करणे असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या तीन गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्द, पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्हयातुन दोन वर्षा करीता तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे.

फिरोज महंमद शेख (वय २९, रा. कदमवाकवस्ती), प्रसाद दत्तात्रय जेठीथोर (वय २०, रा. लोणी काळभोर) व चंद्रशेखर ऊर्फ चंद्रकांत दाजी चोरमले (वय २३, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील तिन्ही आरोपींनी खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव गोळा करणे, शस्त्र बाळगणे, हाणामारी व परिसरात दहशत निर्माण असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केले आहेत. त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये घबराहट, मनामध्ये भितीची भावना निर्माण झाली आहे.

दरम्यान, तिन्ही आरोपींच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर कायद्याचा धाक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्याकडे पाठविला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करून उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तिन्ही आरोपींना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 (1) (अ) (ब) प्रमाणे पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हयातून 2 वर्षाकरिता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे.

सदरची कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार तेज भोसले, प्रशांत नरसाळे व पोलीस अंमलदार दीपक सोनवणे, योगिता भोसुरे यांच्या पथकाने केली.