मुंबई : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
‘ए लाव रे तो व्हिडिओ…’ म्हणत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या. व्हिडिओद्वारे त्यांनी भाजपची पोलखोल केली होती. पण या सभांचा खर्च कोण करत आहे असा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी विचारला होता. यावरून मोठे राजकारण केले जात होते. त्यातच आता निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या प्रचारसभांचा खर्च मनसेला सादर करावा लागणार आहे. याबाबत भाजपने आक्षेप नोंदवला होता. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाला याबाबत पत्र लिहिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने राज ठाकरेंना प्रचार सभांचा खर्च सादर करावा लागणार असल्याची माहिती दिली आहे. राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.
राज ठाकरे स्वत: किंवा त्यांच्या पक्षाचा कोणताही उमेदवार निवडणूक लढवत नसताना ते कोणासाठी प्रचारसभा घेत आहेत, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला होता. या प्रचारसभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा, अशी विचारणादेखील पत्रातून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. भाजपच्या या पत्राची दखल घेत निवडणूक आयोगाने राज ठाकरेंच्या सभाच्या खर्चाचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत.