हुकूमशाही नीतीचा वापर करतेय सरकार
गांधीजींच्या अहिंसा तत्वाचा वापर व्हावा
शरद पवार यांचे प्रतिपादन
रोखठोक महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन
मुंबई : (प्रतिनिधी )
सरकार हुकुमशाही नीती वापरत आहे. जेएनयुमध्ये जे काही घडले ते योग्य नव्हते त्यामुळे संपुर्ण देशात विरोध होत आहे.सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसा तत्वाने उत्तर द्यायला हवे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महात्मा गांधी शांती यात्रेला हिरवा कंदील दाखवताना व्यक्त केले.
माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी महात्मा गांधी शांती यात्रेचे गेट वे ऑफ इंडिया येथून आज आयोजन केले होते. ही यात्रा ३१ जानेवारीला दिल्लीतील राजघाटावर पोचणार आहे. या गांधी शांती यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवला.सुधारीत नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व राष्ट्रीय नोंदणीबाबत देशातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कागदपत्र नसतील तर लोकांना भीती आहे की सरकारकडून त्यांना सरकारने निर्माण केलेल्या कॅंपमध्ये रहावे लागेल अशी परिस्थिती सरकारने निर्माण केली आहे.देशात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे देशातील जनता सरकारवर नाराज आहे. या कारणामुळे मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत आहे.या लोकांना चांगला रस्ता दाखवण्याची गरज आहे आणि त्यासाठी महात्मा
गांधींजींचा अहिंसा तत्त्वाचा मार्ग असून यामुळे संविधान वाचवू शकतो असेही पवार म्हणाले.या आंदोलनाला शांततेचा मार्ग आवश्यक आहे.मला आनंद आहे की,यशवंत सिन्हा त्याच रस्त्यावर आहेत. या शांती यात्रेत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार आहेत.या महात्मा गांधी शांती यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश आंबेडकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार विद्या ताई चव्हाण आणि मुंबईतील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मुंबईकर उपस्थित होते.