पुणे

“केशरी रंगाचा नवा हिंदुस्तान, तिळगुळा संगे वाढवू महाराष्ट्र धर्माची शान”, भगवे तिळगुळ वाटप करून मनसेच्या शुभेच्छा…

“केशरी रंगाचा नवा हिंदुस्तान, तिळगुळा संगे वाढवू महाराष्ट्र धर्माची शान”, असा नारा देत पुणे शहर मनसेच्या वतीने शहरवासीयांना भगव्या रंगाचे तिळगुळ देत मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला.
भगव्या रंगाचे तिळगुळ देत ‘आम्ही हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत’ हा मुद्दा मनसेने पुन्हा अधोरेखित केला. मकर संक्रांतीच्या दिवशी मनसे कार्यालयात भगव्या रंगाच्या फ्लेक्सवर शुभेच्छाही देण्यात आल्या.

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा लोकांसमोर मांडला. अन विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले. पण मनसेला हवं तसं यश मिळालं नाही. पुण्यात कोथरुड सारख्या जागेवर भाजप विरोधात आघाडीने मनसेला पाठिंबा दिला. पण निकालानंतर मनसे महाविकास आघाडीसोबत गेली नाही. त्यामुळे तीन पक्षाच्या सरकारबद्दल राज ठाकरे यांची भूमिका काय याची उत्सुकता मनसैनिकांसह सर्वांनाच लागली होती.

दरम्यान, पुण्यात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचं दोन दिवसांचं ‘संवाद शिबीर’ घेतलं. त्यामध्ये 23 जानेवारीला महाधिवेशन घेण्याची घोषणा केली. यानंतर मनसैनिक पुन्हा अॅक्टिव्ह मोडमध्ये आले. आज भगवे तिळगुळ वाटत, मनसेन शिवसेने हिंदुत्वाचा मुद्दा मागे टाकला असला तरी आम्ही सुरवातीपासून हिंदुत्ववादी होतो आणि राहणार असं ठणकावून सांगितलं.

महाधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातले मनसैनिक कामाला लागलेत. दरम्यान, राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरु झाली. असं झालं तर चांगलंच होईल, असं मनसैनिक म्हणत आहेत. संक्रात हा हिंदूचा सण आहे, आणि भगवा हे जर हिंदू धर्माचे प्रतीक असेल आणि आम्ही भगव्या रंगासह सण साजरा केला तर फरक काय पडतो, असा सवाल मनसैनिक करत आहेत.

गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता मनसेचे इंजिन आता हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडून धावणार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण लोक मनसेला कसे स्विकारतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x