मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन, असा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला.
मनसेच्या पहिल्या अधिवेशऩात त्यांनी पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. आपली भूमिका कायम असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असं होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो, माझी मत तीच आहे जी पूर्वीपासून आहे. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही, असेही त्यांनी सुनावले.
ते म्हणाले की नरेंद्र मोदी जेंव्हा चुकले तेंव्हा मीच त्यांच्यावर टीका केली पण जेंव्हा त्यांनी चांगली गोष्ट केली तर त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो. कलम ३७० असो की राममंदिराचा विषय असो त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो. माझं केंद्र सरकारला सांगणं आहे की समझौता एक्स्प्रेस बंद करा. आज देशात उभे राहिलेले मोहल्ले हे देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झालं तर सैन्याला बाहेरच्या नाही तर आतल्या शत्रूंशीच लढावं लागेल.
हिंदूंच्या सणांच्या विरोधात जेंव्हा कोणी बंदी आणायचा प्रयत्न केला तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच उभी राहिली आहे. पण सरसकट कोणालाच माफी नाही, जर इथे येऊन धिंगाणा घातलात तर मी तुमच्या अंगावर जाईन. रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलिस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होते, याची त्यांनी आठवण करून दिली.
झेंडा बदलणं ही काही नवीन गोष्ट नाही, ह्या आधी जनसंघाने देखील झेंडा आणि नाव बदललंच आहे. १९८० साली जनसंघाचं नाव भारतीय जनता पक्ष झालंच होतं की. हा सर्वसाधारण झेंडा नाही ह्यावर महाराजांची राजमुद्रा आहे त्यामुळे त्याचा सन्मान राखणं ही आपली जबाबदारी आहे. निवडणुकीच्या वेळेस राजमुद्रेचा झेंडा वापरायचा नाही, त्याचा आब राखला गेलाच पाहिजे. हा झेंडा आणावा हे माझ्या मनात गेले एक वर्ष घोळत होतं आणि माझा मूळचा डीएनए हाच आहे जो ह्या झेंड्याचा रंगाचा आहे. मग ठरवलं अधिवेशनाच्या निमित्ताने हा झेंडा समोर आणायचा. पण स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं. ह्या पेक्षा काय वेगळं सोशल इंजिनिअरिंग असणार आहे, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
आज सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे ह्या देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर मुस्लिम ह्या देशातून बाहेर हाकलून देण्याचा. आणि ह्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत अशी माझी माहिती आहे आणि ह्या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे, असे त्यांनी सांगितले